वीज पडल्याने सहा ठार, १९ जखमी

220px-Lightning_NOAA
यवतमाळ – जिल्ह्यात दीर्घ विश्रांतीनंतर परतलेला पाऊस विजेचे तांडवनृत्य करीत बरसत असल्याने दोन दिवसात जिल्हा हादरला आहे. बुधवारी घाटंजी तालुक्यात वीज पडल्याने चार जणांचा बळी गेल्यानंतर आज गुरुवारीही पुसद उपविभागात वीज पडल्याने सहा जणांना प्राण गमवावे लागले. याशिवाय जिल्ह्यात विविध ठिकाणी वीज कोसळल्याने १९ जण जखमी झालेत. महागाव तालुक्यातील करंजखेड, टेंभी, करंजखेड तांडा, वडद (मुडाणा) येथे विजेच्या तांडवनृत्यात तिघांचा मृत्यू झाला. पुसद तालुक्यातील माळ आसोली व माणिकडोह येथे दोघांचा तर उमरखेड तालुक्यातील धनज येथे वीज पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.
आज दुपारी एक ते दोनच्या सुमारास जिल्ह्यात बहुतांश भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी महागाव तालुक्यातील टेंभी येथे शेतात पिकांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या रेखा विलास शिंदे (४०) रा. वेणी (बु.) या झाडाखाली उभ्या होत्या. अशातच झाडावर वीज पडल्याने त्या जागीच ठार झाल्या. त्यांच्यासोबत असलेली सुमन दिगांबर वानखेडे रा. टेंभी ही महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर  खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
दुसºया घटनेत करंजखेड येथील दत्तराव भांगे यांच्या शेतात वीज कोसळली. यामध्ये गजानन रामचंद्र जाधव (२४ ),  संतोष राघो दातकर (२५) हे जागीच ठार झाले. तर बाबाराव कानबा बोरकर (५०), मारोती तुकाराम जाधव (४० ) जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तिसºया घटनेत करंजखेड (तांडा) येथे वीज पडून अनिता रामराव राठोड, अनू साहेबराव राठोड, मारूबाई सुरेश राठोड, नीता पंडित राठोड, सुरेश थावरा राठोड, सुनील सुरेश राठोड, सती उल्हास राठोड, सुशील विजय राठोड, ताई सुरेश राठोड, बंडू बंशी राठोड हे जखमी झाले. चौथ्या घटनेत वडद (मु.) येथील खंडू उमाजी जटाळे यांच्या मालकीच्या बैलाचाही वीज कोसळून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच टेंभी येथील ग्रामपंचायत सदस्य पंडित वानखेडे, गणेश सुकळकर, सीताराम ठाकरे, पंचायत समिती सदस्य संदीप ठाकरे, सरपंच भरोश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली.
पुसद तालुक्यातील माळ आसोली येथे दुपारी दीड वाजताच्या सुमारास वीज कोसळून किशोर राठोड (१८) हा ठार झाला. याच तालुक्यातील माणिकडोह येथील तुकाराम सखाराम पवार (५५) हा ही वीज कोसळल्याने ठार झाला. माधव पंडागळे (६०) रा. पांढुर्णा केदारलिंग हा वीज कोसळल्याने गंभीर जखमी झाला. उमरखेड तालुक्यात दुपारी १ वाजता झालेल्या विजेच्या तांडवनृत्यात वत्सलाबाई संभाजी शेळके (४०) रा. धनज ही महिला अंगावर वीज कोसळून ठार झाली. कळंब तालुक्यातील गांधीनगर येथील शाळेच्या छपरावर वीज कोसळल्याने एक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली. गेल्या दोन दिवसात वीज कोसळण्याच्या घटनेत वाढ झाल्याने  जिल्हा हादरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


7 × seven =