वणी – तालुक्यातील भालर शिवारामध्ये वीज पडून ३३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून नऊ मजूर जखमी झाल्याची घटना दि़१३ जुलै ला ४.१५ वाजता घडली़
भालर शिवारातील विठोबा हेपट यांच्या शेतात काम करणाºया दहा मजूरांवर वीज पडल्यामुळे ज्योती शिवा दोडके ही ३३ वर्षीय महिला जागीच मृत्यूमुखी पडली़ वीजेचा धक्का एवढा जबरदस्त होता की, शेतात काम करणारे शेतमालक विठोबा हेपट, अर्चना अशोक गोहोकार, लता नथ्थू टेकाळ, मंजूषा तुळशीराम गोहोकार, योगीता लक्ष्मण दोडके, मंदा विठोबा हेपट, शिवा दोडके हे जखमी झाले असून संगीता मारोती गोहोकार हीची प्रकृती गंभीर असल्याच्या कारणावरुन तीला उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे़
गत ४० दिवसापासून शेतकरी वर्ग पावसाची आतूरतेने वाट पाहत होते़ भालर शिवारातील हेपट यांनी काही प्रमाणात सिंचन करुन बियानांची लागवड केली होती़ शेतीच्या कामाकरीता मजूरवर्ग शेतात राबत असतांना ४ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस पडत असतांना ही घटना घडली़ या घटनेमुळे भालर गांवात शोककळा पसरली आहे़









