वेदना आणि सुंदरतेतून दज्रेदार साहित्याची निर्मिती – अशोक पवार

15022015-md-ng-3-5775-2-large15022015-md-ng-3-5775-1-large
युवा साहित्य संमेलनाचे थाटात उद््घाटन
वर्धा – जीवनातील वेदना आणि सुंदरता कळली तर दज्रेदार साहित्याची निर्मिती होऊ शकते. त्याकरिता अंत:करणातून वाचन करावे लागते, असे प्रतिपादन बिर्‍हाडकार अशोक पवार यांनी केले.
यशवंतराव दाते स्मृती संस्था आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दोनदिवसीय युवा राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन अनेकांत स्वाध्याय मंदिरात करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून अशोक पवार बोलत होते. संमेलनाचे उद््घाटन संजय भास्कर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर आ. डॉ. पंकज भोयर, विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष वामन तेलंग, डॉ. रवींद्र शोभणे, सरचिटणीस शोभा उबगडे, शाखाध्यक्ष व संमेलनाचे संयोजक संजय इंगळे तिगावकर, यशवंतराव दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते, कार्यवाह राजेंद्र मुंढे, सरकार्यवाह डॉ. स्मिता वानखेडे यांची उपस्थिती होती.
बिर्‍हाडकार अशोक पवार म्हणाले, १९९५ साली परभणीतील अखिल भारतीय मराठी संमेलनातून माझ्या लेखनाची बीजे रोवली गेली. कसदार लेखक होण्यासाठी वैयक्तिक पातळीवर त्याची किंमत मोजावी लागते. अपार मेहनत आणि परिश्रम तसेच वाचनाच्या माध्यमातून कसदार साहित्याची निर्मिती करता येते. त्यासाठी प्रत्येकाने वाचन केले पाहिजे. उपेक्षित साहित्यानेच मराठी साहित्य समृद्ध केले आहे. भारतात कृषी साहित्य पहिल्यांदा प्रेमचंद यांनी लिहिले. महात्मा फुले यांनी शेतकर्‍यांचा आसूड लिहिले. परंतु वर्तमानात कृषी साहित्याचे लेखन अनुभवातून होत नसून ते शहरात बसून होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
जात, धर्म, पंथाच्या बाहेर जाऊन लेखकाने तटस्थपणे लिखान व विचार केल्यास, वेदनेची जाणीव ठेवून सुंदरतेचा संगम घातल्यास निश्‍चितच अस्सल साहित्याची निर्मिती होते, असा विश्‍वास अशोक पवार यांनी व्यक्त केला. प्रत्येक तरुणाने अभ्यासपूर्ण वाचन करावे, असा सल्ला देऊन समाजातील वास्तव चित्र त्यांनी मांडले.
संमेलनाचे उद्घाटक संजय भास्कर जोशी यांनी नेहमीप्रमाणे आपल्या भाषणाची सुरुवात ‘ताल’ने केली. त्यांनी संमेलनात तबल्याचा दादरा ताल यावर विश्लेषण करीत प्रत्येकाने उत्सव, अनुभव, अभ्यास, तटस्थ लेखन, उत्तम वाचन आणि दाद देणे हे सहा ताल नेहमीच लक्षात ठेवल्यास महान साहित्यकृती निर्माण होते, असे सांगून संमेलनाचे उद््घाटन झाल्याचे जाहीर केले. प्रास्ताविक रवींद्र शोभने व प्रदीप दाते यांनी केले. संचालन शुभदा फडणवीस यांनी केले. आभार संजय इंगळे तिगावकर यांनी मानले. संमेलनात प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांचे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला सूतमाला अर्पण करून दीपप्रज्वलनाने संमेलनाची सुरुवात करण्यात आली. आयोजकांच्या वतीने मान्यवरांचे रोपटे, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.? वर्धा – राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनात बोलताना संमेलनाध्यक्ष बिर्‍हाडकार अशोक पवार. व्यासपीठावर उद्घाटक संजय भास्कर जोशी, आ. डॉ. पंकज भोयर, प्रदीप दाते, संजय इंगळे तिगावकर व इतर मान्यवर. बाजूच्या छायाचित्रात दीपप्रज्वलन करताना संजय भास्कर जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


five + = 14