
मुंबई- शक्ती मिलमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी दोषी असल्याचे गुरुवारी न्यायालयाने सांगितले. शक्ती मिलमधील सामूहिक बलात्कार प्रकरणी गुरुवारी ‘इन-कॅमेरा’ सुनावणी झाली. छायाचित्रकार असलेल्या तरुणीवर ३१ जुलै २०१३ रोजी सामूहिक बलात्कार झाला होता. त्यापूर्वी याच आरोपींनी एका टेलिफोन ऑपरेटरवरही सामूहिक बलात्कार केल्याचे उघडकीस आले.
मुंबईतील महालक्ष्मी परिसरातील शक्ती मिल कंपाउंड येथे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात या घटना घडल्या होत्या. आरोपींनी प्रथम ३१ जुलै रोजी २३ वर्षीय टेलिफोन ऑपरेटर असलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी त्यांनी एका छायाचित्रकार मुलीवर बलात्कार केला होता. याप्रकरणी सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती शालिनी जोशी यांच्यासमोर शनिवारी सरकारी पक्षाचे अॅड. उज्ज्वल निकम आणि आरोपींचे वकील यांचा युक्तिवाद पूर्ण झाला. गुरुवारी या प्रकरणाच्या निकालावर सुनावणी होणार असल्याने न्यायालयाच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष लागले होते. या प्रकरणातील अशफाक शेख, कासिम शेख ऊर्फ कासिम बंगाली, सलिम अन्सारी आणि विजय जाधव हे चारही आरोपी दोषी असल्याचे गुरुवारी न्यायालयाने सांगितले. अल्पवयीन आरोपीवर बालगुन्हेगारीच्या विशेष न्यायालयात खटला सुरू आहे. अन्य आरोपींवरील खटला मुंबई सत्र न्यायालयात सुरू आहे. आठ ऑक्टोबर २०१३ रोजी चार आरोपींवर ३६२ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. तर अल्पवयीन आरोपीवर वेगवेगळ्या गुन्ह्यांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या खटल्याच्या सुनावणीसाठी राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील हे न्यायालयात उपस्थित होते. पिडीत तरुणीला आणि तिच्या कुटुंबियांना लवकर न्याय मिळाल्याचे सांगत आर.आर.पाटील यांनी या निर्णयावार समाधान व्यक्त केले









