
यवतमाळ , दि. १९ – छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज गुरुवारी मोठ्या दिमाखदारपणे जिल्ह्यात साजरी करण्यात आली. १५ ते २० संघटना मिळून स्थापित झालेल्या छत्रपती महोत्सव समितीने आज काढलेल्या शोभायात्रेने अवघे शहर शिवमय झाले होते. माँजिजाऊ छत्रपती शिवराय व मावळ््यांची वेशभूषा परिधान केलेल्या बाल कलाकारांनी नगरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते. ‘मी मावळा शिवरायांचा’असे स्फूरणच प्रत्येक शिवप्रेमींच्या चेहºयावर चढल्याचे दृश्य या शोभायात्रेत उमटले होते.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेप्रमाणे होणारी जयंती आज गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, सर्व शाखेय कुणबी समाज संघटना, शिवाजी विद्यालय, वेदधारिणी महाविद्यालय आदी संघटनांनी शिवजयंती उत्सवाची तयारी गेल्या महिन्याभरापासूनच प्रारंभ केली होती. १६ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात शिवचरित्रावर व्याख्यानमाला, शिव मॅरेथॉन स्पर्धा, कराटे स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. आज दुपारी शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या आझाद मैदानातून भव्य शोभायात्रेचा प्रारंभ झाला. वेदधारणी विद्यालय, अण्णासाहेब पारवेकर विद्यालय, डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठ अकोला व वसंतराव नाईक विद्यालय, राष्टÑमाता जिजाऊ संस्था लोहारा, मधुबन नगरी, शिवाजी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रम महाविद्यालयांनी झांकी सादर केल्या. माँ जिजाऊ, छत्रपती शिवराय व मावळ््यांच्या रूबाबदार वेशात असलेल्या बाल कलाकारांनी नगरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत ‘जय जिजाऊ जय शिवराय’ अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते. शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण करीत या शोभायात्रेचा समारोप हनुमान व्यायाम शाळेजवळ झाला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राहुल ठाकरे, डॉ. दिलीप महाले आदी मोठ्या संख्येत शिवप्रेमी शोभायात्रेत सहभागी झाले होते.









