शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी भाजपच्या हिताशी तडजोड नाही

sena-bjp-flag
मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तुलनेत निम्म्या जागा मिळवूनही शिवसेनेला १९९५ च्या जुन्या फॉर्म्युल्यानुसार सत्तेत अर्धा वाटा हवा आहे. सन्मानजक प्रस्ताव मिळाला तर, पाठिंब्याचा विचार करु असे सांगून शिवसेनेने तसे संकेतही दिले आहेत.
मात्र शिवसेनेसमोर कुठेही न झुकता आपल्या अटी-शर्तीनुसार सरकार स्थापन करण्याची भाजपची रणनिती आहे. दिल्लीतील भाजप नेत्यांनी शिवसेनेसमोर गुडघे न टेकण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले की, आम्ही शिवसेनेसोबत युती तोडली नाही. महाराष्ट्रात आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तरी, आम्ही दिल्लीत अनंत गीतेंना राजीनामा द्यायला सांगितला नाही. मुंबई महापालिकेत आमच्या पाठिंब्याने शिवसेनेचा महापौर आहे. यावेळी महाराष्ट्रात सरकार स्थापन करताना आम्ही आमच्या हिताशी कुठलीही तडजोड करणार नाही. महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला सर्वात मोठा पक्ष म्हणून कौल दिला आहे.
यामुळे शिवसेनेने पाठिंबा दिला नाही तर, राष्ट्रवादीचा बाहेरुन पाठिंबा घेण्याचा पर्याय भाजपने खुला ठेवला असून, अपक्षांना साथीला घेऊन, भाजप स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करु शकते.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह मंगळवारी भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्याच्या प्रक्रियेसाठी पक्षाचे निरीक्षक म्हणून मुंबईत येणार होते. मात्र अचानक त्यांचा हा मुंबई दौरा रद्द करण्यात आला. ते आता दिवाळीनंतर मुंबईत येणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक १२२ जागा मिळाल्या आहेत. त्याखालोखाल शिवसेनेने ६२ जागा जिंकल्या. सत्ता स्थापनेसाठी भाजपला आणखी २३ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× one = 7