
नाट्यगृह परिसरात अश्वारूढ पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन
यवतमाळ, दि. 8 : छत्रपती शिवाजी महाराजांचा फार मोठा इतिहास आहे. संपुर्ण राज्यासह देशाला अभिमान वाटावा, असे महाराजांचे कार्य आहे. या कार्याची आठवण होण्यासोबतच त्यांच्या कार्यातून प्रत्येकाने प्रेरणा घेणे आवश्यक आहे. महाराजांचा भव्य पुतळा यवतमाळ शहरात असावा, अशी अनेक वर्षांपासून शहरवाशियांची इच्छा आहे. येत्या वर्षभरात भव्य अश्वारूढ पुतळा उभा राहणार असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
नाट्यगृह परिसरात पुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुभाष राय तर प्रमुख पाहुणे म्हणून खा.भावना गवळी, आ.मदन येरावार, माजी खासदार सदाशिव ठाकरे, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, नप उपाध्यक्ष मनिष तिवारी, मुख्याधिकारी रविंद्र पांढरे उपस्थित होते.
सुरूवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच अश्वारूढ पुतळा बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. शिवाजी महाराज सर्वांचे राजे होते. गोरगरीब जनता तथा अठरापगड जातीच्या कल्याणासाठी महाराजांनी काम केले. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा महाराजांनी सुरू केली. त्यांच्या कार्याची आठवण या पुतळ्यातून होणार आहे, असे पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले.
जिल्हा नियोजन समितीतून पुतळा बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासोबतच पुढील जयंतीदिनापर्यंत पुतळा पुर्ण होणार असल्याचे ते म्हणाले. शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातही भव्य स्मारक उभे राहात आहे. यासोबतच महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचे संवर्धन राज्य शासनाकडून होत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटक आ.मदन येरावार यांचेही यावेळी भाषण झाले. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा समाजाला प्रेरणा देत राहील तसेच महाराजांच्या कार्याची आठवण करून देईल, असे ते म्हणाले. खा.गवळी यांनी प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेतली पाहिजे, असे सांगितले. नगराध्यक्ष सुभाष राय यांचे अध्यक्षीय भाषण झाले. माजी खासदार सदाशिव ठाकरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्याधिकारी रविंद्र पांढरे यांनी केले. यावर्षीच्या नगर परिषदेच्या अर्थसंकल्पात पुतळ्यासाठी निधीची तरतुद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास नगरपरिषदेच्या सभापती प्रणिता खडसे, नंदा जिरापुरे, श्रीमती कोटेकर यांच्यासह नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी तथा नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार नगर परिषदेचे अभियंता रावसाहेब पालकर यांनी मानले.









