
ठाणे- केंद्र सरकारने नुकताच ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला आहे, मात्र अद्याप शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि फुले दाम्पत्याला या किताबाने सन्मानित करण्यात आलेले नाही. याची कारणे काय? असा सवाल करून शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता संमेलनात या संदर्भात ठराव मांडून तो राष्ट्रपतींना पाठवण्यात येईल, अशी माहिती रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी दिली.
देशातील पहिले सर्वसमावेशक राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिले जाते. सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आपल्या राजपदाचा वापर करणारे शाहू महाराज आणि देशात सर्वप्रथम मुलींसाठी शाळा सुरू करून सामाजिक समतेसाठी आयुष्य खर्ची घालणारे महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे ख-या अर्थाने ‘भारतरत्न’ किताबासाठी योग्य आहेत, मात्र भाजपा सरकारने या चारही महनीय व्यक्तींकडे दुर्लक्ष केले आहे. ही बाब देशातील पुरोगामी चळवळीत काम करणा-यांना रुचलेली नाही. त्यामुळे या चारही महापुरुषांना भारतरत्न किताबाने सन्मानित करावे, अशी मागणी एका ठरावाद्वारे करण्यात येणार आहे, असे इंदिसे यांनी सांगितले.









