
फुलसावंगी, दि ६ – पाच एकरशेतात केवळ सहा क्विंटल कापसाचे उत्पादन झाल्याने कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या चिंताग्रस्त शेतकºयाने गळफास घेवून जीवनयात्रा संपविली. ही घटना महागाव तालुक्यातील शिरमाळ येथे काल सायंकाळी ७ वाजता दरम्यान घडली. ग्यानबा तुकाराम मोरे असे मृत शेतकºयाचे नाव आहे.
भांब येथील आनंद पंडागळे या शेतकºयाने जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडत नाही तोच दुसरी घटना उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ग्यानबा मोरे या शेतकºयाने पाच एकर कोरडवाहू शेतात कपाशीची लागवड केली होती. मात्र कमी पावसामुळे कपाशीने दगा दिला. बँक आणि खासगी सावकाराचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. सदर शेतकºयावर सेंट्रल बँक शाखा फुलसावंगीचे ४८ हजार २०० आणि खासगी सावकाराचे २५ हजार असे कर्ज होते. दराटी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांना घटनास्थळी पोहोचायला सूर्यच उगवला. त्यामुळे शेतकरी आत्महत्येविषयी पोलीस प्रशासन कीती संवेदनशील आहे, हे दिसून येते. पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत शेतकºयाच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. महागाव तालुक्यातील शेतकरी आत्महत्येची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.









