शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका शासन तुमच्या पाठीशी – पालकमंत्री संजय राठोड

_DSC0069
यवतमाळ, दि. २७   : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. जिल्ह्यातील अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 11.40 कोटींची मदत वितरीत करण्यात आली. परंतु यापुढे एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असे वचन मला शेतकरी बांधवांकडून हवे आहे. शासन तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्राधान्याने पुढाकार घेतला जाणार आहे. त्यामुळे आत्महत्या करू नका, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या 65 व्या वर्धापनदिनानिमित्त पोष्टल मैदानावर आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभाप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी खा.भावना गवळी, जिल्हा परिषद अध्यक्षा आरती फुफाटे, आ.मदन येरावार, आ.डॅा.अशोक उईके, आ.हरिभाऊ राठोड, आ.ख्वाजा बेग, माजी आमदार नंदीनी पारवेकर, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य वनसंरक्षक श्री.गुरमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय दराडे, अप्पर पोलिस अधिक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक जे.बी.डाखोरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले उपस्थित होते. सुरूवातीस पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्यविरांना नमन केले. संपूर्ण जिल्हावाशियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतांना राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शासनाकडून जनतेची जास्तीत जास्त कामे झाली पाहीजे हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कामास सुरूवात केल्यानंतर अडीअडचणी समजून त्या सोडविण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदत वाटपासाठी जिल्ह्याला 122 कोटी रूपये मिळाले असून त्यापैकी 75 कोटींचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरीत वितरण सुरू आहे. मदत वाटपातून एकही पात्र शेतकरी सुटणार नाही, अशा सुचना प्रशासनास केल्या आहे. पालकमंत्री पदासोबतच महसूल विभागाचा राज्यमंत्री म्हणून काम करीत असतांना जिल्ह्यासाठी काही नाविन्यपुर्ण केले पाहिजे, या भावनेमुळेच जिल्ह्यातील तलाठी कार्यालयांना निवासस्थानांसह सुसज्ज इमारती,तालुक्यांच्या ठिकाणी प्रशासकीय इमारती, पोलिस ठाण्यांच्या ठिकाणी पोलिस पाटील भवन, तहसिल कार्यालयांमध्ये महिला सुविधा केंद्र व प्रतिक्षालये उभारण्याचा मनोदय केला असून टप्प्याटप्प्याने ही
कामे पुर्ण होणार आहे असे ते सांगितले.
प्रत्येकाला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे ही माझी भूमिका आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी दुषीत पाण्याचे स्त्रोत आहे तेथे तेथे जलशुध्दीकरणाची विशेष सुविधा करता येईल का? यासाठी तपासणी करण्याच्या सुचना केल्या आहे. याबाबतही आम्ही लवकरच तोडगा काढू. जिल्ह्यातील स्मशानभूमींचा सर्वांगिन विकास करण्याचे धोरण आम्ही आखणार आहोत. त्यासाठी
नियोजनबध्द पध्दतीने काम केले जाणार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर बंजारा तांडे, वाड्या, वस्त्या आहेत. परंतु त्यांना महसूली गावांचा दर्जा नाही त्यांना तो मिळावा म्हणून लवकरच निर्णय घेतला जाणार राज्य सरकारने अतिशय महत्वाकांक्षी अशी जलयुक्त शिवार योजना आणली. या योजनेत समाजातील सर्वच घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील पतसंस्था, कारखानदार, लघु उद्योजक, शाळा, महाविद्यालयांनी जलयुक्त शिवार योजनेतील किमान 5 गावे दत्तक घेऊन त्या गावांच्या विकासासाठी हातभार लावावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. यवतमाळ जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी यवतमाळातील नाट्यगृह लवकरात लवकर पुर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष लक्ष घालून ते पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तुकडेबंदी कायद्यामुळे लहान शेतकऱ्यांना आपल्या जमीनी खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येत नाही. हे व्यवहार अधिक सुलभ करता यावे म्हणून तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे, असे पालकमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− two = 7