शेतकऱ्यांनो आत्महत्या टाळा कुटुंबाला उघड्यावर पाडू नका – संजय राठोड

Dabhali visit
दाभडीसह चार ठिकाणी आत्महत्याग्रस्त कुटुंबास भेट, आत्महत्याग्रस्त कुटुंबास तातडीने मदत वितरणाचे आदेश
यवतमाळ, दि. २६ : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. काही अडचणी असल्यास संबंधीत अधिकारी अथवा थेट आम्हास भेटा. आत्महत्या अडचणींवरील उपाय नव्हे. तुमच्या सर्व अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन कटीबध्द आहे. परंतु आत्महत्या करू नका. आत्महत्या करून कुटुंबाला उघड्यावर पाडू नका, असे भावनिक आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्यातील समस्त शेतकऱ्यांना केले.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला पालकमंत्र्यांनी आज भेटी देऊन कुटुंबियांशी चर्चा केली. त्यावेळी दाभडी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधतांना त्यांनी सदर आवाहन केले. दाभडी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपुर्वी भेट‍ दिली होती. त्यामुळे चर्चेत आलेल्या या गावातील विठ्ठल सवाई राठोड या शेतकऱ्याने नुकतीच कर्जबजारी व नापीकीमुळे आत्महत्या केली होती. दाभडी येथे या कुटुंबास भेट देऊन कुटुंबियांशी पालकमंत्र्यांनी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना आत्महत्या हा अडचणींवरील मार्ग नव्हे. प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्यासोबतच वाईट दिवसही येत असतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्याने खंबीरपणे सामना केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
या भेटीत पालकमंत्री श्री. राठोड यांनी उमरखेड तालुक्यातील सुभाष मधुकर बिचेवार या शेतकऱ्याच्या कुटुंबासही भेट दिली. यावेळी सुभाष बिचेवार यांच्या मुलांशी संवाद साधतांना पालकमंत्र्यांनी खचुन न जाता खंबीरपणे परिस्थितीचा सामना करण्याचे आवाहन केले. मृत शेतकरी बिचेवार यांना आपला मुलगा इंजिनिअर व्हावा असे वाटत होते. मात्र वडिलांच्या मृत्युमुळे इंजिनिअर होण्याचे स्वप्न अधांतरी असलेल्या त्यांच्या सागर नावाच्या मुलास वडिलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी इंजिनिअरींचा सर्व खर्च उचलण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच शासन म्हणून आपण कुटुंबियांच्या पाठीशे असल्याचे ते म्हणाले.
त्यानंतर दिग्रस तालुक्यातील सावंगी खुर्द येथील शेतकरी रविंद्र सखाराम कोटे तसेच दिग्रस तालुक्यातील विठाळा येथील शेतकरी धरमसिंग संगडा जाधव या शेतकऱ्यांनीही नापिकी आणि कर्जबजारीपणाने आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबासही पालकमंत्र्यांनी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी भेटी दिलेल्या ठिकाणी त्यांनी पक्षाच्यावतीने कुटुंबियांना मदत वितरीत केली. शासनाच्यावतीने देय असणारी मदतही तातडीने वितरीत केली जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले. राज्य शासन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनेक योजना राबवित आहे. त्यात दिर्घकालीन व अल्पकालीन योजनांचा समावेश आहे. आणखीही काही उपाययोजना हाती घेण्याचे प्रस्तावित आहे. यातुन शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल. त्यामुळे आत्महत्या करू नका, असे कडकडीचे आवाहनही त्यांनी चारही ठिकाणी सान्तवणपर भेटी दरम्यान केले. तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत वितरीत करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी पालकमंत्र्यांसोबत माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, उमरखेडचे उपविभागीय अधिकारी दिपक सिंगला तसेच ठिकठिकाणचे तहसिलदार उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 7 = sixteen