
मुंबई- अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस शोकप्रस्तावाने पार पडल्यानंतर दुस-या दिवशी वादळी अधिवेशनाला सुरुवात होणार असे संकेत विरोधकांनी आधीच दिले होते. त्याप्रमाणे मंगळवारी विधिमंडळात गारपीट, अवकाळी पाऊस आणि शेतक-यांच्या मदतनिधीबाबत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. घोषणांनी विधानभवन दणाणून सोडले. यावेळी प्रचंड गदारोळ झाला. परिणामी विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.
विधानसभेत विरोधकांनी मागणी लावून धरल्याने अखेरीस सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पूर्ण झाल्यानंतर या विषयावर चर्चा करण्यासाठी सविस्तर वेळ देण्यात येईल, असे निर्देश दिले. परंतु, विरोधकांनी त्यांना जुमानले नाही.
मुळात आजच्या कामकाजपत्रिकेत सत्ताधारी पक्षातर्फे उपरोक्त विषयावरील प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृह सुरु होताच सर्व विषय बाजूला ठेवून स्थगन प्रस्तावाद्वारे शेतक-यांवर होणा-या अन्यायाबाबत चर्चा करण्याची मागणी सभागृहात केली. त्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच सहकारी पक्षांनी ही मागणी लावून धरली.
मात्र, सत्ताधारी पक्षातील राज पुरोहित यांनी सरकार चर्चेला तयार आहे. सभागृहाचे कामकाज नियमावलीप्रमाणे होऊ द्या, विषय आल्यानंतर याबाबत आपण सविस्तर चर्चा करु, असे सांगितले. त्यावर, जितेंद्र आव्हाड, नितेश राणे, वर्षा गायकवाड, राधाकृष्ण विखे पाटील, दिलीप वळसे पाटील आदींनी प्रस्ताव मांडणे हा विरोधी पक्षनेत्याचा अधिकार आहे. हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि राज्याच्या दृष्टीने तातडीचा विषय आहे. त्यामुळे कामकाज बाजूला सारून या मुद्दयावर चर्चा करण्यात यावी, या आग्रही मागणीसाठी विरोधक सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जमा झाले.
विरोधकांनी नही चलेगी.. नही चलेगी, दादागिरी नही चलेगी, शेतक-यांवर अन्याय करणा-या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणाबाजी करायला सुरुवात केली.
त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आघाडी सरकारच्या १५ वर्षाच्या कामकाजामुळे राज्यातील शेतक-यांची ही दयनीय अवस्था झाली आहे. सत्तारुढ सरकारने शेतक-यांवर होणा-या अन्यायाबाबत प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे सरकारची याबाबत चर्चा करण्याची पूर्ण तयारी आहे. विरोधक ही चर्चा करण्यास धास्तावत आहे. कारण यामुळे सत्य बाहेर पडणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यामुळे काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र, सभापतींनी सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केले.
राज्यभरात अवकाळी पाऊस आणि गारपीठीने थैमान घातले आहे. आधीच दुष्काळाच्या छाया त्यातच अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत राज्यात १००० हून अधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. या कारणास्तव प्रश्नोत्तराच्या तासापेक्षा संकटात असलेल्या शेतक-यांच्या समस्येवर चर्चा करणे यापेक्षा सभागृहात आणखी महत्त्वाचे दुसरे कोणतेच कामकाज असू शकत नाही, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात सांगितले आणि निषेध व्यक्त करत अखेरीस विरोधकांनी सभात्याग केला.
विधान परिषदेतही अवकाळी पाऊस, गारपीठीवर चर्चा करण्याची सरकारने तयारी दर्शवली. मात्र, अध्यक्षांनी नकार दिल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत सभात्याग केला. यानंतर, अध्यक्षांनी विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केल्याचे जाहीर केले









