
पांढरवकडा, दि. २४ – निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाला आहे. बँक व सावकाराचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतकरी राहत आहे. बोरगाव येथील शेतकºयाने कृषी केंद्रातून किटकनाशक औषध विकत घेऊन रस्तयाने पायी चालत असताना विष प्राशन केले. रुग्णालयात नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. आज मंगळवारी २४ मार्च रोजी दुपारी ही घटना घडली.
तानबा वाघू तोडसाम (४०) रा. बोरगाव (कडू) असे शेतकºयाचे नाव आहे. यावर्षी गारपिट व अतिवृष्टीने हाती आलेले पिक मातीमोल झाले. त्यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे. तीन महिन्यावर खरीप हंगाम येऊन ठेपला असून त्यासाठी पैसे कुठून आणायचे, सावकार व बँकेचे कर्ज कसे परत करायचे, कुटूंबाचा गाडा कसा हाकायचा यासह विविध प्रश्न त्याच्या समोर उभे ठाकले आहे. नैराश्याच्या गर्तत सापडलेल्या या शेतकºयाने पांढरकवडा गाठले. शहरातील लोहार लाईनमधील एका कृषी केंद्रातून किटकनाशक औषध विकत घेतले. तेथून रस्त्याने पायी जात असतानाच किटकनाशक प्राशन केले. ही बाब काही नागरिकांच्या लक्षात येताच सदर शेतकºयाला उपजिल्हा रुग्णालयात नेत होते. अशातच वाटेतच शेतकºयाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.









