यवतमाळ – गारपिटीनंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेल्या कंझारा येथील शेतात शेतकºयाने एका पक्षाच्या प्रचारार्थ जंगी पार्टी दिल्याने त्याच्याविरूद्ध लाडखेड पोलिसांनी आचारसहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामध्ये बोरी अरब येथील विष्णू गजानन ठाकरे या यांच्या शेतातील पपई बाग उन्मळून पडल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले होते. दरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या शेतकºयाच्या शेतात भेट देऊन मदत करण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला चालना मिळण्यासाठी या शेतकºयाच्या शेतात ९ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता खास पार्टीचे आयोजन करुन परिसरातील नागरिकांना भोजनासाठी आमंत्रित केले. अनेक नागरिक भोजनावर ताव मारत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक भरारी पथकाला मिळाली होती. त्यावरुन पथकाने या शेतात धाड टाकून व्हिडीओ चित्रीकरण केले. याप्रकरणी भरारी पथक प्रमुख नायब तहसीलदार व्ही.बी. काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन लाडखेड पोलिसांनी गुन्हे दाखल केले.










