संगीतकार कौशल इनामदारचे ‘यलो’साठी नवे कौशल्य

unnamed.jpg2
मराठी संगीत क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव म्हणजे संगीतकार कौशल इनामदार. कौशल इनामदार हे सिनेमांना संगीत देताना सतत नवीन प्रयोग करत असतात आणि त्यामुळेच त्यांचं वेगळेपण चर्चेत राहतं. वेगवेगळ्या सिनेमांना, अल्बम्सना उत्कृष्ट संगीत दिल्यानंतर कौशल इनामदार हे पुन्हा एकदा रसिकांना संगीतमय करण्यास येत आहेत. रितेश देशमुख आणि उत्तुंग ठाकूर यांची निर्मिती असलेल्या आणि सिनेमटोग्राफर महेश लिमये यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘यलो’ या सिनेमाला संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीत दिले आहे.
‘अधांतरी’, ‘आग’, ‘इट्स ब्रेकिंग न्यूज’, ‘कृष्णा काठची मीरा’, ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’, ‘बालगंधर्व’, ‘रास्ता रोको’, ‘हंगामा’, ‘अजिंठा’ आणि ‘संशयकल्लोळ’ या गाजलेल्या सिनेमांना दिलेल्या वेगळ्या संगीतामुळे तसेच मराठी अभिमान गीताच्या अफाट यशामुळे संगीतकार कौशल इनामदार सतत चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या ‘बालगंधर्व’ आणि ‘अजिंठा’ या सिनेमासाठी त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. आता पुन्हा एकदा ते ‘यलो’ च्या निमित्ताने आपल्या सुंदर चालींची जादू प्रेक्षकांवर टाकणार आहेत. या सिनेमाला पार्श्वसंगीत सुद्धा त्यांनीच दिले आहे.
याबद्दल सांगताना कौशल इनामदार यांनी सांगीतले की, “या सिनेमातील दोन गाणी आणि पार्श्वसंगीत सुद्धा मीच केलंय. ‘यलो’च्या निमित्ताने मी रॉक म्युझिक प्रकारावर पहिल्यांदाच काम केलंय. आधीच्या कुठल्याच सिनेमांमध्ये मी हा जॉनर वापरलेला नाहीये तरी सुद्धा महेशने माझ्यावर विश्वास ठेवला. हा जॉनर माझ्यासाठी पूर्णपणे नवीन असल्याकारणाने मी दुसरं कोणतही काम या दरम्यान हाती घेतलं नाही. ‘यलो’साठी रॉक म्युझिक करायचं होतं म्हणून मी तब्बल सहा महिने फक्त रॉक म्युझिक ऎकलं. याआधी मी रॉक फार ऎकलेलं नव्हतं. महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही गाण्यांसाठी ‘की-बोर्ड, इलेक्ट्रॉनिक गिटार, ड्रम आणि बेस’ फक्त ही चार वाद्य वापरण्यात आली आहे. सिनेमाचा बॅकग्राऊंड स्कोर आणि सिनेमाची गाणी ही वेगवेगळी वाटता कामा नये याची आम्ही खूप काळजी घेतली. गुरू ठाकूर या गीतकाराबरोबर पुन्हा एकदा काम करायला मिळाले. अतिशय सुंदर शब्द गुरूने लिहिले असून दोन्ही गाणी अतिशय श्रवणीय झाली आहेत. माझ्यासाठी हा सिनेमा खूप वेगळा होता. वेगवेगळ्या सिनेमांवर काम करत असतांना आपल्याला खूप काही शिकायला मिळत असतं. पण ‘यलो’वर काम करत असताना मी माणूस म्हणून सुद्धा खूप बदललोय. हे खूप कमी सिनेमांच्याबाबतीत होतं. त्यामुळेही हा सिनेमा माझ्यासाठी अतिशय अतिशय वेगळा अनुभव होता”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 1 = six