
लखीमपुर – संपूर्ण देशात भाजप फक्त मोठमोठया घोषणा करत आहे. भाजपने नेहमीच व्देषाचे राजकरण केले आहे. भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर असताना त्यांनी काय केले ? बोलणे आणि काम करणे यात भरपूर फरक आहे अशा शब्दात संपुआ प्रमुख आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपवर टीका केली. त्या लखीमपूर येथील निवडणूक प्रचारसभेमध्ये बोलत होत्या.
काँग्रेसने देशाची गंगा-जमुना संस्कृती घट्ट केली तर, भाजपने नेहमीच जातीय राजकरण करुन देशाला कमकुवत केल्याचा आरोप सोनियांनी केला. २००९ च्या निवडणूक जाहीरनाम्यातील बहुतांश आश्वासने आम्ही पूर्ण केली. आता २०१४ च्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनेही आम्ही पूर्ण करु, पण त्यासाठी आम्हाला तुमच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे असे सोनिया म्हणाल्या.
आम्ही खोटी आश्वासने देत नाही. जी आश्वासने देतो ती पूर्ण करतो. प्रत्येक हातात शक्ती, प्रत्येक हाताची प्रगती यावर आमचा विश्वास असल्याचे सोनियांनी सांगितले. आसाम आणि अन्य भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही देशासाठी प्राणांचे बलिदान दिल्याचे सोनियांनी सांगितले.
देश घडवण्यावर आमचा विश्वास आहे. भाजप आणि अन्य विरोधी पक्ष त्यावेळी कुठे होते ? स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही याचे काय योगदान आहे ? देश, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचेच काम त्यांनी केले असा आरोप सोनियांनी केला. विरोधकांच्या खोटया प्रचाराला, आश्वासनांना बळी न पडता काँग्रेस उमेदवाराच्या पाठिशी उभे रहाण्याचे सोनियांनी उपस्थितांना आवाहन केले.









