सत्यपाल महाराजांना ‘आम्ही सारे कार्यकर्ता पुरस्कार’प्रदान

10250200_744277838975247_8077564667489218126_n
चाळीस वर्षांच्या प्रबोधन यात्रेचा सन्मान
अमरावती – राष्ट्रसत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबांच्या प्रबोधनकारी विचार पंरपरेचे शिलेदार, सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांना आम्ही सारे फाऊंडेशनचा ‘आम्ही सारे कार्यकर्ता पुरस्कार’ अमरावती येथे एका अविस्मरणीय सोहळ्यात प्रदान करण्यात आला़ चाळीस वर्षांपासून अव्याहतपणे सुरू असलेल्या या प्रबोधन यात्रेचा गौरव बघण्यासाठी अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात अलोट गर्दी झाली होती़
आदर्श ग्राम हिवरे बाजारचे शिल्पकार, सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते सत्यपाल महाराजांना १ लाख रूपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले़ सत्यपाल महाराजांची वृद्ध आई सुशीलाबाई व वडिल विश्वनाथ चिंचोळकर प्रामुख्याने उपस्थित होते़ यावेळी व्यासपीठावर आ़ बच्चू कडू, आ़ हर्षवर्धन सपकाळ, आ़ ख्वाजा बेग, आ़ प्रा़ वीरेंद्र जगताप, चंद्रकांत वानखडे, आम्ही सारे फाऊंडेशनचे अध्यक्ष, ‘पुण्य नगरी’चे कार्यकारी संपादक अविनाश दुधे व डॉ़ गजानन नारे उपस्थित होते़
सत्काराला उत्तर देताना सत्यपाल महाराज आपल्या खास वºहाडी शैलीत म्हणाले की, तुम्ही नेहमीच आयकता माझं, रात्रंदिवस पब्लिकमध्ये राह्यतो मी, पैशावर प्रेम केलं नाही बाबू नाहीतर सत्यपाललेबी रामपाल होता आलं असतं, मी वर्तमानपत्र वाचून कीर्तन करतो, पोथी वाचून नाही़ कारण आता पोथी वाचाचा टाईम नाही, आता ग्रामगीता, गाडगेबाबा, तुकाराम अन् डॉ़ आंबेडकर सांगायचा टाईम आहे़ सत्यपाल महाराज पुढे बोलताना म्हणाले की, शिक्षण काळाची गरज आहे़ संततीसाठी संपत्ती जमवू नका, पण चांगल्या विचारांची संतती निर्माण करा, आपल्या आयाबहिणींनी गाडगेबाबा वाचले असते तर आज समाजात रामपाल जन्मला नसता़ तत्पूर्वी सत्यपाल महाराजांना कार्यकर्ता पुरस्कार देण्याची पार्श्वभूमी अविनाश दुधे यांनी प्रास्ताविकातून मांडली़ ते म्हणाले, समाज जागृतीचे सत्यपाल महाराजांचे कार्य हे कार्यकर्ता प्रवृत्तीतून आणि राष्ट्रसंत व गाडगे महाराजांना अभिप्रेत असलेल्या प्रबोधनकाराच्या वृत्तीतून झाले आहे़ बुलडाण्याचे आ़ हर्षवर्धन सपकाळ यांनी ग्रामस्वराज्य आणि सत्यपाल महाराजांच्या कार्याविषयी आपले विचार मांडले़ ते म्हणाले, गावातील सामान्य माणूस देश चालविण्यास उत्सुक आहे़ त्याचा सहभाग निश्चित झाला पाहिजे़ विकासाच्या प्रक्रियेत जन भागिदारी निर्माण व्हावी म्हणून राज्याच्या राजधान्यांमध्ये केंद्रीत झालेली सत्ता ग्रामसभांकडे कशी जाईल व ग्रामसभा ग्रामस्वराज्याकडे कशी जाईल, याचा विचार व्हायला हवा़ या दृष्टीने सत्यपाल महाराजांचे प्रबोधन समाजात आवश्यक आहे़ आ़ ख्वाजा बेग यांनीही सत्यपाल महाराजांच्या कार्याचा गौरव केला़ ‘सांगा कुणी त्यांना पेरू नका धर्मात्मे, शेतात इथल्या आता माणसे पिकावयास हवी’ असे म्हणत त्यांनी या देशात हिंदू, मुस्लिम, बौद्ध व सर्वधर्मिय बहुसंख्य झाले़ फक्त भारतीय तेवढा अल्पसंख्यांक राहीला़ सत्यपाल महाराजांनी या भारतीयाला बहूसंख्य करावे़ असे आ़ बेग म्हणाले़  तर सत्यापासून दूर जाणाºया समाजाला सत्याच्या जवळ नेणारे सत्यपाल महाराजांच्या वाणीने महाराष्ट्र ऊजळून निघाला आहे़ सत्यपालांच्या वाणीतून रोज गाडगेबाबा व तुकोबा भेटायला येतात, हे महाराष्ट्र सौभाग्य असल्याचे आ़ बच्चू कडू म्हणाले़ चंद्रकांत वानखडे यांनी सुद्धा आपल्या भाषणात सत्यपाल महाराजांच्या प्रबोधनकारी वृत्तीचा गौरव केला़
कार्यक्रमाला सत्यपाल महाराजांची पत्नी नंदाताई, पुत्र डॉ़ धर्मपाल, सून व नातवंडासहीत सर्व कुटुंबीय उपस्थित होते़ या अविस्मरणीय सोहळ्याला आचार्य हरिभाऊ वेरूळकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय खोडके, सोमेश्वर पुसदकर, आशुतोष शेवाळकर, किशोर बोरकर, रविकांत तुपकर, डॉ़ अतुल यादगिरे, संजय वानखडे, अमर हबीब, डॉ़ संजय बाहेकर, रामेश्वर अभ्यंकर, विजय विल्हेकर, गजानन घोंगडे, शरद वानखडे, निरज आवंडेकर, नितीन पखाले, संजय पवार, ज्ञानेश्वर रक्षक, प्रदिप पाटील, नितीन चौधरी  यांच्यासह ‘आम्ही सारे’चे पदाधिकारी व शेकडो गुरूदेवभक्त व सत्यपाल महाराजांचे चाहते उपस्थित होते़
अखेरपर्यंत मी कार्यकर्ताच – सत्यपाल महाराज
कार्यकर्ता पुरस्कार देऊन आपण मला कार्यकर्ता ठरविले़ मी अखेरपर्यंतच कार्यकर्ता राहील़ असे सत्यपाल महाराजांनी सत्काराला उत्तर देताना म्हटले़ पुरस्कारात मिळालेल्या एक लाख रूपयाच्या सहायाने एक रूग्णवाहिका विकत घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले़ ‘लहानपणी कितीही चांगलं गाणं म्हणलं तरी एक रूपया मिळत नव्हता, आज तुया लेकराले एक लाखाच पुरस्कार मिळाला’असे त्यांनी त्यांच्या वृद्ध आईकडे बघून म्हटले़ तेव्हा महाराजांचा कंठ दाटून आला व सभागृहसुद्धा गहिवरले़

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ four = 5