
भंडारा – महाशिवरात्रीच्या पूर्वरात्री दरोडेखोरांनी जिल्ह्यातील तुमसर येथील सराफा व्यापारी संजय सोनी-राजपूत यांच्या घरी धाडसी दरोडा टाकला. तिघांची निर्घृण हत्या करून सुमारे पाच कोटी रुपयांचा ऐवज लुटला. यातील सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून काही मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक कैलास कणसे यांनी शुक्रवारी दिली. यातील पाच जण तुमसरातील माता वॉर्डमधील असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, संजय यांना विहीरगावनजीक गाडीतच संपविल्याची कबुली दरोडेखोरांनी दिली आहे.
पोलिस अधीक्षक कैलास कणसे यांनी पत्रपरिषद घेऊन घटनेचा उलगडा केला. संजय सोनी हे सोन्या-चांदीचे ठोक व्यापारी होते. व्यवसाय मोठा असल्याने त्यांना नेहमीच चंद्रपूर, उमरेड, गोंदिया, बालाघाट, नागपूर, शिवणी, वर्धा, बडनेरा, अमरावती अशा विविध भागात जावे लागत होते. त्यासाठी गाडीवर ड्रायव्हर त्यांनी ठेवला होता. तो सुटीवर असल्यास शहरातील ओळखीच्या चालकाला रोजंदारीवर ठेवले जात होते. यात दरोडेखोरांपैकी एक असलेल्या चालकाला दोनवेळा संजय यांच्यासोबत जाण्याचा योग आला. त्यांच्या बोलण्यातून या चालकाला व्यवसायाची कल्पना आली. नागपूर येथील काही मित्रांना त्याने याविषयीची माहिती दिली. दरोड्याची योजना आखली. त्यानुसार नेहमीच्या चालकाच्या सुटीवर जाण्याची वाट पाहणे सुरू होते. २५ फेब्रुवारीला संजय यांनी त्याला गोंदिया, आमगावला दुसऱ्या दिवशी जाण्याविषयीची कल्पना दिली. त्याने लगेच होकार दिला. सहकाऱ्यांना याविषयीची माहितीही दिली. ठरल्यानुसार तो संजय यांच्यासोबत गेला. गोंदियाहून निघताना सहकाऱ्यांना फोन करून तिरोडा तालुक्यातील तुमसर रोडवरील बिरसी फाट्याजवळ राहा, असे सांगितले. त्यानुसार ते बिरसी फाट्यावर आले. सोबत नॉयलॉनची दोरी आणि इतर साहित्य खरेदी केले. गाडी बिरसी फाट्यासमोरून तुमसरकडे वळताच त्यांनी दुचाकीने पाठलाग केला. विहिरगावनजीक शेतशिवारात लघुशंकेसाठी चालकाने गाडी थांबविली. मागून आलेल्या सहकाऱ्यांनी दोरीने संजय यांचा गळा आवळून हत्या केली.
संजय सोनी यांना वाटेतच संपविले
मृतदेह गाडीतच ठेवून तुमसरला आले. त्यांच्याकडे असलेली दुचाकी उपजिल्हा रुग्णालयासमोर ठेवली. गाडीचा आवाज ऐकताच संजय यांच्या पत्नी पुनम व मुलगा दुमिल बाहेर आले. मुलाने गेट उघडली. गाडी पार्क झाली. दरम्यान, दुमिलचे तोंड दाबून संजयला चक्कर येत असल्याने पाणी आणण्यास पूनम यांना सांगितले. हीच संधी साधत सातही जण घरात शिरले. पूनम यांना संशय आल्याने त्यांनी दागिने घेऊन जा, पण आम्हाला सोडून जा अशी विनवणी केली. मात्र गाडी चालकाने पूनम आपल्याला ओळखत असल्याचे सांगितले. नंतर दोघांचाही गळा आवळून खून करण्यात आला. गाडीत असलेला संजयचा मृतदेह काढून वरच्या खोलीत नेऊन ठेवण्यात आला. तिथून रोख व मुद्देमाल घेऊन मिटेवानीमार्गे हिंगणा शेतशिवारात रात्री ३ वाजतादरम्यान गेले. मुद्देमालाची वाटणी करून निघून गेले. या घटनेने तुमसरात खळबळ उडाली. पोलिसांनी तपासासाठी दहा पथके तयार केले. विविध ठिकाणी पाठविण्यात आले. दरम्यान, गाडीचा चालक फरार असल्याचे लक्षात आले. चौकशीनंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.









