सांस्कृतिक नेतेगिरी

 

काल तू म्हणालास ,
जात म्हणजे थुकायचं डबडं
धर्म म्हणजे हाडीताप
लोकशाही , शेळीचं शेपूट
विद्रोह , ठिणग्यांचं मोहोळ
बांधिलकी , सुसंस्कृत कपडेलत्ते
अस्मिता , हाडामांसाचं बहरलेलं झाड
आणखी न समजणारं बरंच बोललास .

आम्ही जामखुश ,
आम्हास तू प्यार झालास ,

आज गेलास तू
प्रस्थापित कॉलनीतच राहायला
जातीपेक्षा प्रवृत्ती महत्वाची
धर्मातील विसंगती टाळू शकतो
विद्रोह म्हणजे भडक स्टेटमेंट
बांधिलकी , नर्मदेचा गोटा
अस्मिता , बिनपाऱ्याचा आरसा
संयम , विनय , मनस्वी , तामसी वगैरे
शब्द लागलास बरळायला

तू बदलल्याचा प्रश्न आहेच !
त्याहून दिशेचा मोठा प्रश्न आहे
विष आणि विषत्व वेगळं नसतं रे !
आम्ही तुझ्याशी नातं तोडीत आहोत
तू आमचा होतास , हे ही
विसरून जात आहोत

आमची रेशनकार्डे आम्ही
वेगळी करीत आहोत ….

अरुण काळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


4 + = eleven