
नवी दिल्ली- अव्वल रँकिंग निश्चित करणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरल्यावर सायना नेहवालने रविवारी आणखी एक इतिहास घडवला. इंडिया ओपन सुपरसिरीज बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी सायना पहिली भारतीय ठरली. याबरोबरच सायनाने तिचा अव्वल रॅँकिंगचा आनंद द्विगुणित केला.
सायनाच्या अव्वल रॅँकिंगवर अधिकृतपणे गुरुवारी शिक्कामोर्तब होईल. तत्पूर्वी, सायनाने रविवारी अंतिम फेरीत तिसरी सीडेड थायलंडच्या रॅचनॉक इंटॅनॉनचा २१-१६, २१-१४ असा सलग दोन गेममध्ये पराभव केला.
सुरुवातीपासून राखलेले वर्चस्व सायनाने जेतेपदावर शिक्कामोर्तब होईपर्यंत कायम ठेवले. २०११पासून इंडिया ओपनला सुपरसिरीजचा दर्जा मिळाला आहे. मात्र तेव्हापासून महिला एकेरी, पुरुष एकेरी किंवा दुहेरी अशा कोणत्याही प्रकारात भारतीयाने घरच्या प्रेक्षकांसमोर अंतिम फेरीही गाठली नव्हती.सायनाचीही या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी याआधी म्हणजे गेल्यावर्षी गाठलेली उपांत्यपूर्व फेरी होती. यंदा मात्र सुरुवातीपासून सायनाने प्रभावी खेळ केला.









