‘सिंधुरत्न’: ‘त्या’ अधिकाऱ्यांचा मृत्यू

मुंबई – मुंबई बंदरापासून साधारण ५० सागरी मैलांवर काल (बुधवारी) भारतीय नौदलाच्या सिंधुरत्न पाणबुडीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत लेफ्टनंट कमांडर कपिष मुवल आणि लेफ्टनंट मनोरंजनकुमार या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सात जखमी नौसैनिकांना वाचविण्यात यश आले असून त्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने नौदलाच्या आयएनएचएस अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
अवघ्या दोन महिन्यांपूर्वी डागडुजी-दुरुस्ती करून पाण्यावर स्वार झालेल्या आयएनएस सिंधुरत्न या रशियन बनावटीच्या किलो श्रेणीतील पाणबुडीचे परीक्षण सुरू असतानाच बुधवारी पहाटे सहा वाजता नौसैनिकांच्या कक्षातून धूर येऊ लागला. आग शमवण्याच्या प्रयत्नात नाकातोंडात धूर जाऊन नौसैनिकांचा श्वास कोंडला गेला. या अपघातानंतर लेफ्टनन्ट-कमांडर हुद्द्याचे डेप्युटी इलेक्ट्रिकल ऑफिसर आणि लेफ्टनन्ट दर्जाचे वॉचकिपिंग ऑफिसर हे दोन अधिकारी बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध सुरू होता. मात्र, अपघातग्रस्त पाणबुडी आज (गुरुवारी) मुंबई बंदरात दाखल झाल्यानंतर या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले. दरम्यान, पाणबुडीची बारकाईने पाहणी करून अपघाताची कारणे शोधली जातील तसेच दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येईल, अशी माहिती नौदलाने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ four = 7