यवतमाळ – यवतमाळातून पांढरकवड्याकडे चोरट्या मार्गाने नेल्या जात असलेल्या सुगंधीत तंबाखूसह तीन आरोपींना मोहदा येथे सापळा रचून जेरबंद केले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केली. यात सुगंधीत तंबाखूसह १७ लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला.
राज्यात गुटखाबंदी असून परराज्यातून तंबाखूजन्य पदार्थाची खुलेआम आयात होत आहे. विशेष म्हणजे अन्न व औषधी प्रशासन मंत्री ना. मनोहर नाईक यांचा हा गृह जिल्हा आहे. महिनाभरात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे मंत्र्याच्या जिल्ह्यातच गुटखाबंदीचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट होते. यवतमाळ येथून पांढरकवड्याकडे दोन वाहनातून सुगंधीत तंबाखू नेल्या जात असल्याची टिप विशेष पथकाला मिळाली. त्यावरून मोहदा येथे त्यांनी सापळा रचला. बोलेरो व टाटा मॅजिक हे दोन्ही वाहन मोहद्यात पोहोचताच एका वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यात सुगंधीत तंबाखू आढळून आला. तर एका वाहनाचा पाठलाग करून पांढरकवडा नजीक पकडण्यात आले. दोन्ही वाहनात सुगंधी तंबाखू आढळून आला. या तंबाखूची किंमत ११ लाख १ हजार ७५० रुपये असून १ लाख २५ हजाराची रोकड व दोन वाहनही जप्त केले. एकूण ही कारवाई १६ लाख २६ हजार ७५० एवढी आहे. ललित जोधवानी रा.सिंधी कॅँम्प, संदीप राठोड रा. वाघापूर, मुनेश्वर वाट रा. मोहदा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. ही कारवाई विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक राजू वटाने, गजानन डोंगरे, विशाल भगत, भोजराज करपते, गणेश देवतळे यांनी केली.









