सुप्रिया सुळेंना भरसभेत भोवळ

supriya-sule
तासगाव – तासगाव पोटनिवडणुकीच्या प्रचारातील भाषणादरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे चक्कर येऊन व्यासपीठावरून कोसळल्यानं कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. परंतु, त्या लगेचच शुद्धीवर आल्यानं सगळ्यांचीच काळजी मिटली. सुप्रिया सुळेंच्या डोक्याला किंचित मार लागल्याचं कळतं.
राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात येत्या ११ एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. आबांच्या पत्नी सुमन पाटील यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी आज श्रीराम हॉलमध्ये राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी मार्गदर्शन केलं. हे भाषण संपवताना अचानक त्यांना चक्कर आली आणि त्या पोडियमचा आधार घेता-घेता व्यासपीठावरून खालीच कोसळल्या. हा प्रकार पाहून कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. ताईंना नेमकं काय झालं, हे कुणालाच कळेना. पण सुप्रिया लगेचच शुद्धीवर आल्या. पाणी पिऊन त्यांनीच घाबरलेल्या कार्यकर्त्यांना सावरलं. तोपर्यंत, डॉक्टरांनीही सुप्रिया सुळे यांची प्राथमिक तपासणी केली आणि त्या ठीक असल्याचं सांगितलं, तेव्हा सगळ्यांनीच निःश्वास सोडला.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांना चक्कर येण्याचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही, पण उन्हाळ्यामुळे हा प्रकार घडला असावा. आपली तब्येत एकदम ठीक असल्याचं सुप्रियाताईंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 6 = eighteen