
निंगणूर (यवतमाळ), दि. १ – आईसोबत शेतात गेलेल्या सूरज बोअरवेलमध्ये पडला होता. स्थानिक नागरिक व प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न करून बारा तासानंतर म्हणजेच रात्री २.१५ वाजताच्या सुमारास त्याला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.
उमरखेड तालुक्यातील निंगणूर येथील शंकर आखरे हे आपल्या कुटुंबीयाचा गाडा हाकतात. काल शनिवारी दुपारी ३ वाजता दरम्यान आखरे यांची पत्नी दोन वर्षीय मुलगा सूरज मुलगी पूजा यांनासोबत घेऊन नईम नवाब यांच्याशेतात गेली होती. अशातच सूरज व त्याची बहिण पूजा हे दोघे खेळत होते. दरम्यान पोत्याने झाकून असलेला बोअरवेलचा खड्डा न दिसल्याने सरळ त्यात कोसळला. भाऊ बोअरवेलमध्ये पडल्याचे बघतात घाबरलेल्या पूजाने आरडाओरड करून महिलांना गोळा केले. या घटनेची माहिती नईम नवाब व सरपंच वली उल्ला खान यांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. सदर प्रतिनिधीने घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करून या घटनेची माहिती दिली. तहसीलदार शेजाळ यांनी उपविभागीय अधिकारी दीपक सिंगला यांच्याशी संपर्क साधून घटनास्थळ गाठले. तहसीलदार घटनास्थळी पोहचेपर्यंत आरोग्य विभागाची अॅम्बुलंन्स वैद्यकीय चमू आणि जेसीबी घटनास्थळी दाखल झाली होती. तहसीलदारांनी डिझास्टर रेस्क्यू पथकाच्या संपर्कात राहून आॅपरेशन कसे राबवायचे या बद्दल टिप्स घेतल्या. प्रथम बोअरवेलमध्ये सूरजला आॅक्सीजन कसे मिळेल, याची व्यवस्था केली. तोपर्यंत जेसीबीच्या सहाय्याने खोदकामाला सुरूवात झाली होती. प्रथम टारगेट डिझास्टर रेस्क्यू फोर्स आणि त्यानंतर अकोला येथून नॅशनल डिझास्टर फार्स सायंकाळी सहा वाजेपर्यंत घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बचावकार्याला वेग आला होता. सहा वाजतानंतर रेस्क्यू फोर्सने बचाव कार्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली होती. या घटनेची वार्ता परिसरात पोहोचल्याने घटनास्थळी नागरिकांची गर्दी होत होती. तसेच सायंकाळ होत असल्याने अंधारात काम करणे कठीण जात होते. वीज वितरण कंपनीकडून मोठ्या लाईटची व्यवस्था करून प्रकाशाची अडचण सोडविण्यात आली. बोअरवेलला समांतर खड्डा खोदणे सुरू असताना पाणी लागले. त्यामुळे शेजारच्या शेतातील मोटरपंप आणून पाणी बाहेर काढण्यात आले. ५० फूट खड्डा खोदल्यानंतर पाणी पातळी वाढल्यास कसे होईल, या विचाराने उपस्थितांच्या हृदयाचे ठोके चुकत होते. मात्र डिझास्टर रेस्क्यू पथकाने आलेल्या समस्यांचा सामना करीत अंतर्गत भूयार करून रात्री ठिक २.१५ मिनिटांनी सूरजची बोअरवेलमधून सुखरूप सुटका केली. रेस्क्यू टिमकडून ‘कामयाब’ झाल्याचा संदेश ‘भारत माता की जय’ असा देताच उपस्थित नागरिकांनी ‘भारत माता की जय’ असा जय घोष करून परिसर दणाणून सोडला होता. या क्षणाचा अनुभव घेताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते. चिमुकल्याला लगेच उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याची तपासणी करून सुखरूप असल्याने परत फुलसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. घटनास्थळी पूर्णवेळ आ. राजेंद्र नजरधने, उपविभागीय अधिकारी दीपक सिंगला, तहसीलदार सचिन शेजाळ यांच्यासह माजी आ. विजय खडसे, उत्तम राठोड, राम राठोड, ठाणेदार मानकर उपस्थित होते.
तिघांचा सत्कार
बचाव कार्यात निंगणूर येथील मारोती शंकर पांडे व भगवान मेंडके या दोघांनी मोलाची मदत केली. तसेच अंकुश राठोड या युवकाने घटनेची माहिती तहसीलदारांना देवून कर्तव्यतत्परता दाखविली. तिघांच्या कार्याची दखल घेवून ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवारी सत्कार करण्यात येणार आहे.









