मुंबई- गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने नवा विक्रम केला. सोमवारी सकाळी बाजाराला सुरुवात होताच उर्जा, तेल, गॅस, वाहन आणि बँकींग क्षेत्रातील शेअर्सच्या विक्रमी खरेदीने निर्देशांक २२,४६४.८६ या नव्या सर्वोच्च पदावर विराजमान झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ३२.९५ अंकानी वाढ झाल्याने निफ्टीनेही ६, ७२६.८५ असा उच्चांक गाठला.
‘बाझेल ३’ च्या अंमलबजावणीला मुदतवाढ मिळाल्याने बँकिंग क्षेत्रात झालेल्या मोठ्या खरेदीने मागच्या आठवड्यातच सेन्सेक्सच्या तेजीला बळ मिळाले. शुक्रवारी सेन्सेक्स १२५.९० अंकांच्या वाढीसह २२,३३९.९७ वर बंद झाला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ५४.१५ अंकांची वाढ झाली आणि तो ६.६९५.९० वर बंद झाला. परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. सेबीच्या आकडेवारीनुसार ‘एफआयआय’ने १२ मार्चपासून बाजारात १८,०७३ कोटींची गुंतवणूक केली आहे. विक्रमाकडे आठवडाभर मागे वळून न पाहणा-या भांडवली बाजाराच्या सोमवारच्या प्रवासाची सुरुवात चांगली झाली आहे. या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आणि मंगळवार एक एप्रिल रोजी रिझव्र्ह बँकेचे पतधोरण जाहीर होणार आहे, त्यामुळे उत्सुकता आणखी शिगेला पोहचली आहे.










