सेन्सेक्स २२,००० च्या घरात

Sensex crossed 19,000 mark
मुंबई- परदेशी गुंतवणूकदारांनी सलग पाचव्या सत्रामध्ये गुंतवणुकीवर भर दिल्याने सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने २२,००० च्या शिखराला स्पर्श केला आणि तो १५ अंकांच्या किरकोळ वाढीसह २१,९३४.८३ नव्या उच्चांकावर बंद झाला. तर निफ्टीने ६,५३७.२५ चा विक्रमी स्तर गाठला.
सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून बाजारात तेजीचे वातावरण तयार झाले आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांबरोबरच (एफआयआय) किरकोळ गुंतवणूकदारही आपला पोर्टफोलिओ वाढवत आहेत. ‘बीएसई’च्या माहितीनुसार शुक्रवारी एफआयआयने बाजारात २,५७७.४४ कोटींची गुंतवणूक केली. ज्याने बाजारातील तेजीला मोठे बळ मिळाले.भांडवली वस्तू, गृह निर्माण, बँकिंग, तेल शुद्धीकरण या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरला चांगली मागणी होती. तर माहिती तंत्रज्ञान आणि औषध निर्माण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सला विक्रीचा सामना करावा लागला. दरम्यान सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने २२,०२३.९८ अंकांपर्यंत झेप घेतली. तर निफ्टीनेही ६,५६२.२० चा विक्रमी स्तर गाठला होता. गेल्या पाच सत्रांमध्ये निर्देशांकात ९८८ अंकांची वाढ झाली आहे.जागतिक बाजारातील तेजी आणि एफआयआयच्या गुंतवणुकीवर भर यामुळे बाजारातील तेजी दिवसागणिक वाढत असल्याचे बोनांझा पोर्टफोलिओच्या वरिष्ठ संशोधक निधी सारस्वत यांनी सांगितले. सेन्सेक्समधील ३० पैकी १५ कंपन्यांचे शेअर वधारले. यात मारुती सुझुकी ३.७४ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ३.४२ टक्के, एलअँडटी ३.३३ टक्के, एचडीएफसी बँक ३.२३ टक्के, एसबीआय २.५८, बजाज ऑटो २.५३ टक्क्यांनी वधारले. तर माहिती तंत्रज्ञानातील टीसीएस ३.६७ टक्के, टाटा मोटर्स ३.२० टक्के यांच्यासह सन फार्मा, गेल इंडिया, कोल इंडिया आणि हिंदाल्कोच्या शेअरमध्ये घट झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


4 × = four