
यवतमाळ – यश ही सहज मिळणारी बाब नसून त्यासाठी कठोर परीश्रम, चिकाटी, इच्छाशक्ती, आत्म्विश्वास आदी गोष्टींची गरज असण्यासोबतच चौफेर वाचनही अत्यंत महत्वाचे आहे. स्पर्धा परीक्षेच्या तंत्रात बरेच बदल झाले असून घोकमपट्टीऐवजी विश्लेषणावर भर दिला जात आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा थेट संबंध अवांतर वाचनाशी आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधीकारी राजेश खवले यांनी केले.
येथील यवतमाळ करिअर ॲकेडमीच्या वतीने अयोजित मनोविकास ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनानिमित्य् आयोजित ‘स्पर्धा परीक्षेत अवांतर वाचनाचे महत्व्’ याविषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. स्थानिक स्नेहनगर मधील वायसीएच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात राजेश खवले यांनी स्पर्धा परीक्षेत वाचन किती महत्वाचे आहे, हा विषय उदारहणांसह सोपा करून सांगितला. स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारे सन, वार, महिने, विविध आकडेवारी लक्षात ठेवण्यासाठी ब्राह्मी पद्धतीचा उपयोग कसा होतो, याबाबतही खवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वाचनाच्या मर्यादा असेल तर, यशाने तुमच्यापर्यंत का यावे, असा परखड प्रश्न करून विद्यार्थ्यांनी वाचनाला मर्यादा घालू नये, असे आवाहनही त्यांनी केले. सिलॅबसच्या बाहेरचे वाचनही आता स्पर्धा परीक्षेत उपयोगी पडते. आयुष्यात ग्रंथरूपी बारूद भरली नाही तर आयुष्याला काहीच अर्थ उरत नाही. वयानुरूप वाचनाची आवड, निवड बदलू शकते परंतु, वाचाल तरच वाचाल, हे वेळीच लक्षात घेतले पाहिजे असे ते म्हणाले.
व्यक्तीमत्व विकासासंदर्भात मनोविकास प्रकाशनचा हातखंडा आहे. मेंदूला चालना आणी माणसाला दिशा देणारी पुस्तके मनोविकास सातत्याने वाचकांना उपलब्ध करून देते. ही पुस्तके स्पर्धा परीक्षेसोबतच दररोजच्या आयुष्यातही अत्यंत मोलाची आहे, हा अनुभव आपण घेतला असल्याचेही राजेश खवले यांनी यावेळी सांगितले. यवतमाळात प्रथमच एक महिना म्हणजे 17 मे पर्यंत चालणारा मनोविकास ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आल्याने यवतमाळकर ख-या अर्थाने वाचन समृद्ध होतील, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी यवतमाळ करिअर ॲकेडमीचे संचालक संभाजी राणे, रमेश पखाले यांनी राजेश खवले यांचे रोपटे व ग्रंथभेट देऊन स्वागत केले. प्रास्ताविक नितीन पखाले यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील असंख्य विद्यार्थी, पालक व वाचकांनी गर्दी केली होती.









