स्वप्नील-सोनालीचा ‘मितवा’

Mitwa
पुणे (अमीत इंगोले) – ‘रामानंद सागर प्रॉडक्शन’चा वारसा लाभलेल्या ‘मिनाक्षी सागर प्रॉडक्शन’ ने आगामी ‘मितवा’ चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. रामानंद सागर यांची नात, मोती सागर यांची मुलगी असलेल्या मिनाक्षी सागर यांनी याआधी अनेक हिंदी मालिकांचे लेखन केले असून प्रथमच त्या त्यांच्या निर्मिती संस्थेद्वारे मराठी चित्रपटाची निर्मिती करताहेत. ‘व्हिडिओ पॅलेस’ची प्रस्तुती असलेल्या ‘मितवा’ चित्रपटात लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या भूमिका असून दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी या दिग्दर्शन करणार आहेत.
‘रामानंद सागर यांच्या रामायणमधील ‘कुश’ ची आणि कृष्णामधील ‘कृष्णा’ची भूमिका स्वप्नील जोशीने साकारली होती. इतक्या वर्षांपासूनचा आमचा स्नेह असल्याने आमच्या पहिल्या मराठी चित्रपट देखील स्वप्नीलला घेऊन करायचे निश्चित केले. त्याने देखील या प्रस्तावाला तात्काळ होकार दिला, असे मिनाक्षी सागर यांनी सांगितले.‘मितवा’ ही म्युझिकल लव्हस्टोरी असून या चित्रपटाला शंकर, एहसान, लॉय या संगीतकारांचे संगीत लाभले आहे. सोबत मराठीतील सध्याचे आघाडीचे संगीतकार निलेश मोहरीर, अमित राह, पंकज पडघन हे देखील या चित्रपटासाठी संगीत देणार आहेत. या चित्रपटासाठी गीते अश्विनी शेंडे, मंदार केळकर, मंगेश कांगणे यांनी लिहिली आहेत. कथा स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी लिहिली असून अनेक लोकप्रिय मालिकांचे लेखक शिरीष लाटकर यांनी चित्रपटाची पटकथा- संवाद लिहिले आहेत. दुनियादारीचे सिनेमटोग्राफर प्रसाद भेंडे हे आगामी ‘मितवा’ ची सिनेमटोग्राफी करणार असून महेश साळगांवकर कला दिग्दर्शक आहेत, संजय डावरा हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माता आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


7 + = fifteen