दुबई – लवकरच मुस्लिम लोंकांची हज यात्रा सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर दुबई स्थित कंपनीने हज यात्रेकरुंसाठी ‘हजसलाम’ हे नवे अॅप तयार केले आहे.
दरवर्षी हजारो मुस्लिम बांधव हज यात्रेला जातात. ही यात्रा अल-हिज्जा ह्या महिन्यामध्ये सौदी अरेबिया या देशातील मक्का या पवित्र शहरी भरते. यावेळी हज यात्रेकरुंना एक प्रकारे मार्गदर्शक म्हणून या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. इंटरनेटशिवाय हे अॅप वापरता येऊ शकते. या अॅपच्या सहाय्याने यात्रेकरु त्यांची प्रार्थना ऐकू अथवा वाचू शकतात. तसेच काबाच्या भोवती किती प्रदक्षिणा घालायच्या आहेत याची संपूर्ण माहिती हे अॅप पुरवते. तसेच या अॅपद्वारे आपण कोठे आहोत याचे ठिकाण सांगितले जाते. स्थळापासून ते किती दूर आहेत. तसेच तेथील संपूर्ण रस्ता, जवळील मशीद अथवा रुग्णालय कोठे आहे याची इत्यंभूत माहिती या अॅपच्या सहाय्याने मिळते. ‘हज यात्रेकरुंना ही यात्रा सुखकारक व्हावी आणि संपूर्ण भक्तिभावाने या यात्रेचा आनंद घेता यावा यासाठी आम्ही हे अॅप तय़ार केले असल्याचे’, हजनेट चे कार्यकारी प्रमुख अली दाबाजा यांनी सांगितले.









