हल्ल्याला महिना पूर्ण मात्र पानसरेंचे मारेकरी मोकाट

pansare
मुंबई – महाराष्ट्रातील विचारवंत आणि ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याला आज सोमवारी महिना पूर्ण झाला. हल्ल्याला महिना पूर्ण होऊनही अद्यापही पानसरेंचे मारेकरी पोलिसांना शोधता आलेले नाहीत.
अज्ञात बंदुकधा-यांच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या पानसरेंनी चार दिवस मृत्यूशी झुंज दिली अखेर २० फेब्रुवारीला त्यांची प्राणज्योत मालवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोविंद पानसरे यांच्यावर झालेला हल्ला हा महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेवरील हल्ला असून, पानसरेंच्या मारेक-यांना पकडण्यात कुठलीही कसूर ठेवणार नाही असे त्यावेळी सांगितले होते.
आता महिना होऊनही आरोपी सापडत नसल्याने सरकार नक्की करतय काय ?, सरकारचा हेतू प्रामाणिक आहे ना ? डॉ. नरेंद्र दाभोलकरांप्रमाणेच या प्रकरणाचे होणार नाही ना ? असे प्रश्न जनता विचारत आहे. गोविंद पानसरे यांच्या मारेक-यांना पकडण्यासाठी पोलिसांची २५ विशेष पथके तयार करण्यात आली. मात्र इतका मोठा पोलिस फौजफाटा कामाला लावूनही पानसरेंच्या हत्येसंदर्भातील ठोस धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
मारेक-यांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी बक्षिसाची रक्कम पाच लाखावरुन पंचवीस लाखापर्यंत वाढवली पण त्याचाही काहीही फायदा झालेला नाही. १६ फेब्रुवारीला गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा नेहमीप्रमाणे शिवाजी विद्यापीठ परिसरातून मॉर्निंग वॉकवरुन परतत असताना, दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पानसरे आणि त्यांच्या पत्नींवर एकूण पाच गोळया झाडल्या.
त्यातील तीन गोळया गोविंद पानसरे यांना लागल्या. एक गोळी त्यांची पत्नी उमा यांना चाटून गेली. पानसरे यांना लगेचच कोल्हापूरच्या अँस्टर आधार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर चार दिवस उपचार सुरु होते. प्रकृती नाजूक असली तरी स्थिर होती. त्यानंतर २० फेब्रुवारीला त्यांना एअर अॅॅम्ब्युलन्सने मुंबईच्या ब्रीच कँण्डी रुग्णालयात हलवण्यात आले त्याचदिवशी रात्री त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि रात्री अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
पानसरे यांचीही अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याप्रमाणेच हत्या झाली. दाभोलकर सकाळी मॉर्निंगवॉकला बाहेर पडले असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्यावर जवळून गोळया झाडून निर्घुण हत्या केली होती. दाभोलकर यांच्या हत्येला दीडवर्षाहून अधिक झाली मात्र अद्यापही त्यांचेही मारेकरी सापडलेले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


4 + eight =