
यवतमाळ, दि. २५ – आर्णी येथील अरुणावती नदीपात्रात एका लोखंडी पेटीत जिवंत हॅँन्ड गे्रनेड व काडतूस आढळल्याची घटना आज गुरुवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकाराने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून सदर बॉम्ब १५ वर्षापूर्वीचे असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अफसर खान हा युवक आज २५ डिसेंबर रोजी वडील इसाक खान व काका शकूर महेबूब मातनासे यांच्यासह अरुणावती प्रकल्प परिसरात सरपण गोळा करण्यासाठी गेला होता. अशातच अरुणावती नदी पात्राच्या चिखलात लोखंडी पेटी पायाला लागली. त्यांनी पेटी काढून बघितले असता त्यामध्ये जिवंत हॅन्ड ग्रेनेड तीन, ए.के. ४७ रायफल राऊड २३, रिव्हालवर काडतूस ३ दिसून आले. पेटीत साहित्य दिसताच घाबरलेल्या युवकाने वडील व काकाला सांगितले. त्यानी ठाणेदार हनुमंत गायकवाड यांचे निवासस्थान गाठून हे बॉॅम्ब, काडतूस, राऊंड स्वाधीन केले. हे साहित्य बघून ठाणेदारासह पोलीस कर्मचाºयांची भंबेरी उडाली होती. काही वेळात ही वार्ता शहरासह तालुक्यात पसरल्याने खळबळ उडाली. आर्णी तालुका हा नक्षलग्रस्त असून या भागात १५ ते २० वर्षापूर्वी तेथे नक्षलवादी सक्रीय होते. अशातच हॅँड ग्रेनेड व काडतूस आढळल्याने खळबळ उडाली आहे. या पेटीतील बॉम्ब व साहित्य १५ वर्षापूर्वीचे असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली.
साहित्य नक्षलवाद्यांचे असण्याची शकतात- जे.बी.डाखोरे
आर्णी तालुका नक्षलग्रस्त म्हणून परिचित आहे. नांदेडमधील विजयकुमार नामक नक्षलवादी या भागात सक्रीय होता. तसेच त्यांने घातक कारवाई देखील केली होती. ही घातक शस्त्र नक्षलवादी, सिमेवरील सैनिक बाळगतात. त्यामुळे घातक शस्त्र नक्षलवाद्यांचे असू शकतात, असा अंदाज प्रभारी पोलीस अधीक्षक जे.बी.डाखारे यांनी वर्तविला.









