
पीटीआय – सध्या संगणक युग आहे. आपल्या जीवनात हे संगणक इतके आवश्यक झाले आहेत की, अगदी साधी कामेसुद्धा आपण संगणकाद्वारे करून घेतो. संगणकावरील या प्रमाणाबाहेरील परावलंबित्वामुळे भविष्यात हेच संगणक मानवाला गुलाम करून संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवतील अशी भीती फार पूर्वी व्यक्त करण्यात येत होती. त्या वेळी काल्पनिक समजल्या जाणा-या या प्रकाराकडे लक्ष वेधणारे अनेक हॉलिवुडपट येऊन गेले. तर काही वर्षापूर्वी भारतातही मानवापेक्षा जास्त ताकदवान असलेल्या रोबोने उडवलेला हाहाकार चित्रपटातून पाहायला मिळाला होता.
या बाबीकडे आपण जास्त गांभीर्याने पाहिलेले नसले तरी आगामी काळात ही भीती खरी ठरण्याची चिन्हे आहेत. त्याला कारणही तसेच आहे. ज्या प्रकारे मानव संगणकाला कृत्रिम बुद्धिमत्ता प्रदान करत आहे व सातत्याने त्याची क्षमता वाढवत जात आहे ते पाहता आगामी १५ वर्षामध्ये मानवाने आपल्या सोयीसाठी बनवलेले संगणक आणि यंत्रमानव मानवालाच मागे टाकणार असल्याचे भाकीत गुगलमधील तज्ज्ञांनी वर्तवले आहे. आगामी २०२९पर्यंत संगणक मानवापेक्षाही अधिक हुशार होणार असून आपण काय बोलत आहोत आणि कोणत्या गोष्टी सांगत आहोत याचेही आकलन संगणकांना सहजपणे होणार आहे, असे भाकीत गुगलमधील अभियंता विभागाचे संचालक रे कुर्झवेल यांनी वर्तवले आहे.फ्लॅटबेड स्कॅनर्स, चेहरा ओळखू शकणारा संगणक प्रोग्राम आणि लिपीचे श्राव्य शब्दात रूपांतर करणारे ‘टेक्स्ट टू स्पीच’ सिंथेसायझर यांसारख्या उपकरणांचा शोध कुर्झवेल यांनी लावला आहे. १९९० मध्ये त्यांनी वर्तवलेले भाकीत महत्त्वाचे होते. त्या काळात त्यांनी असे भाकीत केले होते की १९९८ पर्यंत बुद्धिबळाच्या विश्वविजेत्यालाही पराभूत करणारा संगणक तयार होईल आणि आश्चर्याची बाब म्हणजे १९९७मध्ये आयबीएमच्या डीप ब्लू या संगणकाने गॅरी कॅस्पारोव या बुद्धिबळ विश्वविजेत्याला पराभूत केले. तसेच इंटरनेटचे महत्त्व खूपच जास्त प्रमाणात वाढणार असल्याचे भाकीतही कुर्झवेल यांनी त्या वेळी वर्तवले होते.त्यांनी वर्तवलेले भाकीत मनुष्याप्रमाणेच आता संगणकही आपल्या हुशारीचे दर्शन घडवेल, असे कुर्झवेल यांनी गेल्या वर्षी म्हटले होते. ‘द सिंग्युलॅरिटी’ ही संकल्पना लोकप्रिय करणारे तंत्रज्ञ म्हणून ते ओळखले जातात. मानवाप्रमाणेच बुद्धिमान वर्तन ज्या दिवशी संगणक करू लागतील त्या दिवसापासून त्यांनी मानवाला मागे टाकलेले असेल आणि हा दिवस २०२९ पर्यंत उगवेल, असे त्यांनी म्हटले आहे.









