
यवतमाळ, दि. २ – जिल्ह्यात दोन दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसाचा फटका गहू, हरभरा, संत्रा, भाजीपाला पिकांना बसला आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यात २८ हजार ८३१ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने प्राथमिक सर्वेक्षणातून वर्तविला आहे. तर ३९६ गावे बाधित झाली आहे. शनिवारी दुपारी अचानक वादळी वाºयाला सुरूवात झाली. बघता-बघता गारपीटीने झोडपून काढले. यामुळे गहू, हरबरा, संत्रा, आंबा पिकांचे अतोनात नुकसान झाले. ८७ हजार ६०० हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन करण्यात आले. जानेवारीपर्यंत गहू, हरभरा पिकांची पेरणी सर्वात जास्त करण्यात आली. मात्र शनिवारी दुपारपासून कोसळलेल्या पावसामुळे १७ हजार ४४६ हेक्टर तर १ मार्च रोजीच्या पावसामुळे ११ हजार ३८५ हेक्टर असे एकूण २८ हजार ८३१ पिकांचे नुकसान झाले आहे. आंब्याचा मोहोर गळून पडल्याने शेतकºयांना हाही फटका सहन करावा लागणार आहे. सर्वात जास्त फटका यवतमाळ, दारव्हा, नेर, पुसद, दिग्रस, उमरखेड, महागाव तालुक्याला बसला आहे.









