४० प्रवाशांचे मृतदेह सापडले

air-asia-plane
जाकार्ता – इंडोनेशियाच्या हवाई हद्दीतून रविवारी बेपत्ता झालेल्या एअर एशियाच्या विमानातील ४० प्रवाशांचे मृतदेह आढळले आहेत. इंडोनेशियातून उड्डाण केल्यानंतर ज्या ठिकाणी हे विमान अखेरचे दिसले, तेथील समुद्रातच हे मृतदेह तरंगताना आढळल्याचे तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता विमानाचा शोध घेणारे इंडोनेशियाचे तपास पथक मंगळवारी हेलिकॉप्टरने बोर्नियो बेटावर उतरले. तिथे त्यांना काही मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. फुगलेल्या अवस्थेत असलेल्या या मृतदेहांची ओळख पटविता येणे मात्र शक्य आहे. हे मृतदेह इंडोनेशियन नौदलाच्या एका जहाजावर आणल्याचे राष्ट्रीय शोध व बचाव पथकाचे संचालक एस. बी. सुप्रियादी यांनी सांगितले. मृतदेहांवर कोणत्याही प्रकारचे लाइफ जॅकेट नव्हते, अशी माहिती सुप्रियादी यांनी स्थानिक पत्रकारांना दिली. नौदलाचे प्रवक्ते मनहन सिमोरंकीर यांनीही मृतदेह मिळाल्याच्या माहितीला दुजोरा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 2 = ten