४00 जण गाडले गेले!

IMG-20140730-WA0049

युद्धपातळीवर मदतकार्य २५ मृतदेह बाहेर काढले लष्कराची मदत

पुणे : आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागातील माळीण गावासाठी मंगळवारची रात्र काळरात्र ठरली. रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळीण गावावर डोंगराचा कडा कोसळला. त्यामध्ये सुमारे ४00 गावकरी गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बुधवारी २५ जणांचे मृतदेह हाती लागल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. या दुर्घटनेत गावातील ६७ घरांपैकी ४४ घरे गाडली गेली आहेत. गावची सुमारे ८00 लोकसंख्या लक्षात घेता गाडले गेलेल्यांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे एकच शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, अदिवासी विकास मंत्री आणि सबंधित खात्याचे मंत्री, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

माळीण गाव डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील दुर्गम भागात आहे. बुधवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास डोंगराचा कडा अचानक कोसळला अन् ४४ घरे या कोसळलेल्या कड्याखाली दबली गेली आणि संपूर्ण माळीण गावच उद्ध्वस्त झाले. घटनास्थळी जिल्हाधिकारी सौरभ राव, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, शिवसेनेचे नेते अरुण गिरे यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तर राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक जणांनी घटनास्थळी धाव घेतली. आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी जुन्नर, आळंदी नगरपालिकेच्या यंत्रणेसह विविध ठिकाणांहून सामाजिक कार्यकर्ते मदतकार्यात गुंतले आहेत. माळीण हे गाव डोंगरदर्‍यांमध्ये वसलेले असून गावाची लोकसंख्या ७00 ते ८00 आहे. मंगळवारी रात्री गावातील सर्वजण झोपले असतानाच बुधवारी पहाटेच्या सुमारास डोंगराचा कडा अचानक तुटला अन् मोठा अनर्थ घडला. पहाटेच घटना घडल्याने घरातील कोणत्याच माणसाला बाहेर पडणे अशक्य झाल्यानेच सर्वजण कड्याखाली दबले गेले.

दरम्यान, जोरदार पावसामुळे दुर्घटनाग्रस्त माळीण गावात मदतकार्यात अडथळे येत आहेत. गेल्या पंधरा वर्षांतील आदिवासी भागात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची आंबेगाव तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. जेसीबी मशीनच्या साहाय्याने बचावकार्य सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) दोन पथके रुग्णवाहिकेसह माळीण गावी पोहोचली असून मदत व बचावकार्य सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


7 × one =