५० लाख कोटींचे व्यवहार बंद

मुंबई- बँक कर्मचा-यांच्या दोन दिवसीय संपामुळे धास्तावलेल्या ग्राहकांनी मुंबई, ठाण्यासह ठिकठिकाणी एटीएम सेंटरमधून रोकड काढून घेतल्याने रविवारी संध्याकाळी अनेक एटीएम सेंटरमधील गंगाजळी संपुष्टात आली. रविवारी कॅशचा भरणा होत नसल्याने आणि सोमवार, मंगळवारच्या संपामुळे बँका बंद आणि एटीएममध्येही खडखडाट या परिस्थितीत हजारो बँक ग्राहकांना व्यवहारासाठी रोकड उपलब्ध होणार नाही. या अभूतपूर्व परिस्थितीत सर्वसामान्य ग्राहकांचे सर्वाधिक हाल होणार आहेत. रविवारसह सलग तीन दिवस आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील सुमारे ५० लाख कोटींचे व्यवहार थंडावणार आहेत.
सर्व सरकारी बँकांच्या कर्मचा-यांसह प्रमुख खासगी बँकांचे कर्मचारीही या देशव्यापी संपात सहभागी झाले आहेत. बुधवारी सकाळीच बँकांचे दरवाजे उघडणार असून एटीएम सेंटरमध्ये रोकड भरणा बुधवारीच होईल. तेव्हाच ही परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी बँक कर्मचा-यांच्या सर्व संघटनांनी संपाचे हत्यार उपसले आहे. या संपकाळात सर्व चेक क्लिअरिंग, पैसे काढणे, एटीएम असे सारे व्यवहार बंद राहणार आहेत. बँकांच्या सुमारे ७ ते ८ हजार शाखा, सात हजार एटीएम सेंटर या काळात बंद असतील. सार्वजनिक क्षेत्रातील २७ बँका, १२ खासगी आणि ८ विदेशी बँकांचे कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन संघटना संपाबाबत ठाम आहे, असे संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विश्वास उटगी यांनी सांगितले. पाच वर्षात बँकांची उलाढाल तिप्पट वाढली. त्यांच्या नफ्यात १० टक्क्यांनी वाढ झाली. तरीही वेतनवाढीबाबत सरकारने काहीच हालचाली केल्या नाहीत. या संपामुळे ग्राहकांना होणा-या त्रासाला भारतीय रिझव्‍‌र्ह बँक जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. सोमवारी दुपारी १२ वाजता आझाद मैदान येथे कर्मचा-यांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे, असेही ते म्हणाले. मुंबईतील १५ हजार एटीएममध्ये रविवार वगळता रोज रोख रक्कम भरली जाते. मात्र, सोमवार, मंगळवारी संप असल्याने रोख रक्कम भरता येणार नाही. त्यामुळे सर्वत्र एटीएममध्ये पैशांचा खडखडाट होण्याची शक्यता आहे. संप संपल्यावर बुधवारी संध्याकाळनंतर एटीएममधून पैसे मिळू शकतील. आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा, एचएसबीसी आणि एचडीएफसी या खासगी बॅँक सुरू राहणार आहे. तसेच या बॅँकांची सर्व एटीएमही सुरू राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


5 − = four