
साधना कुळकर्णी करणार मार्गदर्शन, व्यसनग्रस्तांचे होणार शंकासमाधान
यवतमाळ – एकवीसाव्या शतकात एकीकडे मुक्त व्यसन करणारी बळावलेली पिढी तर दुसरीकडे व्यसनमुक्तीसाठी आखुडते घेणारी पिढी अशी मोठी दरी तयार झाल्याने व्यसनांचे बळी वाढल्याची वस्तुस्थिती आहे. अत्याधुनिकतेच्या नावाखाली नाना व्यसनांना शरण जात असलेल्या युवापिढीला या गर्तेतुन बाहेर काढण्यासाठी लढणारी महिला यवतमाळकरांशी संवाद साधणार आहे. प्रयास सेवांकुर संस्थेच्या माध्यमातुन १५ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसहाला नंदुरकर विद्यालयातील श्री सत्यसाई क्रिडारंजन सभागृहात
आयोजित आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना या कार्यक्रमात यवतमाळकरांशी पुणे येथील साधनाताई कुळकर्णी संवाद साधणार आहेत. अमरावती येथील डॉ.अविनाश सावजी देखील आपल्या सेवाकार्याच्या अनुभव कथनातुन व्यसनमुक्त चळवळीला बळ देणार
आहेत. युवापिढीला गिळंकृत करीत चाललेल्या व्यसनांच्या विरोधात दिर्घकाळापासुन लढा देत असलेल्या साधनाताईंचा कष्टप्रद जीवन प्रवास त्या स्वत: उलगडणार आहेत. आपल्या प्रतिभासंपन्न कलाकार पतीला जडलेल्या मद्यपानाच्या वाढत्या आजाराशी लढतांना त्यांना संसारात तथा समाजात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ओढाताण, चिडचीड, त्रागा, नैराश्य, नकारात्मक भावनांनी जीवन व्यापले असतांना त्यांनी अॅल-अॅनॉन या जागतिक संघटनेच्या माध्यमातुन व्यसनमुक्तीवरील कार्यासाठी
केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा त्या यवतमाळरांसमक्ष विषद करणार आहेत. व्यसनमुक्त होण्यासाठी व्यसनाधीन असलेल्यांनी, त्यांचे कुटुंबियांनी तसेच मित्रमंडळींनी काय करावे आणि काय करु नये यावर सर्वकष चर्चा होणार आहे. या निशुल्क संवाद सोहळ्यात व्यसनमुक्तीसाठी कार्य करणाऱ्यांनी, पिडीतांनी तसेच आपल्या नजीकच्या व्यक्तीला व्यसनमुक्त करु इच्छीणाऱ्यांनी उपस्थित राहावयाचे आवाहन प्रयास तर्फे करण्यात आले आहे.
साधनाताईंचा परिचय…
भुसावळ येथे शालेय तसेच पुणे येथे एमई पर्यतचे उच्चशिक्षण घेतलेल्या साधनाताई कुळकर्णी केंद्रीय जल तथा विद्युत संस्थेत ३० वर्षापासुन शास्त्रज्ञ म्हणुन कार्यरत आहेत. १९८५ मध्ये बाबा आमटे यांचेसमवेत भारत जोडो यात्रेत कन्याकुमारी ते काश्मीर सायकलने प्रवास केला असुन युरेका व लोकविज्ञानमध्ये सक्रीय सहभाग असतो. अॅल-अॅनॉन संघटनेच्या माध्यमातुन व्यसनमुक्तीसाठी अविरत कार्य सुरु आहे.









