मुंबई – एका राष्ट्रीयकृत बँकेच्या ६० खातेदारांच्या खात्यांतून १३ लाख २५ हजार रुपयांची ऑनलाइन शॉपिंग केल्याप्रकरणी नुकताच कफ परेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासानुसार, हा स्किमिंगचा प्रकार असल्याचा पोलिसांना संशय आहे.
बँकेच्या नेव्ही नगर शाखेतील ६० खातेदारांच्या डेबिट कार्डचा डेटा चोरून ऑनलाइन शॉपिंग करण्यात आली आहे. त्यानंतर खातेदारांना मोबाइलवर संदेश आल्याने त्यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. १६ ते २७ नोव्हेंबरच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचे बँक अधिका-यांच्या लक्षात आल्यानंतर नुकतीच या प्रकरणी कफ परेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.त्यानुसार फसवणूक व माहिती तंत्रज्ञानाचा गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामागे स्थानिक टोळीचा हात असल्याचा पोलिसांना संशय असून, आयपी अॅड्रेस शोधण्याचे काम सुरू असल्याचे एका पोलिस अधिका-याने सांगितले.डेटा चोरी करण्यासाठी आरोपींनी स्कििमगचा वापर केल्याचा संशय आहे.एटीएम सेंटरमधील सीसीटीव्हीचे फुटेज मिळवण्याचे काम पोलिस करत आहेत. गेल्यावर्षी अशाच प्रकारे कुलाबा येथील एटीएम सेंटरमधून खातेदारांचा डेटा चोरी करून त्यांना ऑनलाइन गंडा घालण्यात आला होता. पण, पोलिसांच्या मते ही दोन्ही प्रकरणे वेगळी असून, कफ परेडमध्ये डेबिट कार्डच्या सहाय्याने ऑनलाइन खरेदी करण्यात आली आहे. त्यात आरोपींनी डीश केबल कनेक्शनचे पैसेही भरले आहेत. त्यामुळे या प्रकरणात स्थानिक टोळीचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे.









