उत्पादन शुल्कच्या १०७ धाडी, ५७ आरोपींना अटक
यवतमाळ – निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध मद्य विक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने आरंभलेले धाडसत्र सुरुच असून गेल्या दोन दिवसात दोन वेगवेगळ्या धाडीत देशी दारुचे ५९ बॉक्स म्हणजे २८३२ बॉटल्स जप्त करण्यात आले आहे. आचारसंहिता लागल्यानंतर या विभागाने धडक मोहिम राबविले असून त्याअंतर्गत आतापर्यंत १०७ धाडी घालून ५७ आरोपींना अटक केली, तर ६ लाख २३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
काल प्राप्त झालेल्या गुप्त माहितीवरून या विभागाच्या पथकाने सापळा रचुन डोंगरखडा ते राळेगाव रोडवर मजरा गावाच्या शिवारात भरधाव वेगाने जात असलेल्या वाहनाचा ५ किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग करून ८ देशी दारुचे बॉक्स आरोपींकडून जप्त केले. मोटर सायकलसह आरोपी नंदकिशोर जयस्वाल, पवन दडमल यांना अटक केली. आज अशाच प्रकारच्या गुप्त माहितीवरून राळेगाव पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या कोपरी या गावाच्या हद्दीत एका घरी धाड टाकून देशी दारुचे ५१ बॉक्स जप्त केले. तसेच आरोपी गजानन मारोती पराते व गजानन किसनाजी कुचनकार यांना अटक करण्यात आली. या दारूची किंमत ७६ हजार इतकी आहे. नजीकच्या काळात जिल्ह्यात केलेली जप्तीचीही सर्वात मोठी कारवाई आहे.
प्रथम दर्शनी सदर दारू साठा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांना वाटप करण्यासाठी पुरविण्यात येणार होता असे आढळून आले आहे. निवडणूकीस अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने ठिकठिकाणी उत्पादन शुल्क विभागाने पथके नेमले असून अवैध मद्य विक्रीवर करडी नजर ठेवली जात आहे. निवडणूक काळात आचारसंहिता लागल्यानंतर आतापर्यंत १२०७ लिटर देशी दारु, २८ लिटर विदेशी दारु, ४५ लिटर बियर, ५५० लिटर हातभट्टी, १२,५२७ लिटर मोहाफुल सडवा जप्त करण्यात आला आहे. तसेच १ मारोती ओमनी, १ मारोती ८०० व १ मोटरसायकलचा समावेश आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी १०७ धाडी घालून ५७ आरोपींना अटक केली तर ६ लाख २३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कार्यवाही अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनात निरिक्षक ए.बी. झाडे, ए.एम झुमडे, सुबोधकुमार केडीया, दुय्यम निरिक्षक उमेश शिरभाते, ए.पी. चिटमटवार, सहाय्यक दुय्यम निरिक्षक आर.एम.राठोड तसेच कर्मचारी एस.जी.घाटे, एम.पी.शेडे, ए.पठाण, एम.जी.रामटेके, संदीप मनवर, प्रविण मसराम, साठे, बळीराम मेश्राम, डी.बी.पेंदोर आदी सहभागी झाले होते.










