11 हजार ग्रामपंचायती होणार ई-बँकींग

यवतमाळात 200 ग्रामपंचायतीमध्ये बँकींग सेवेस प्रारंभ

4x6=20

यवतमाळ : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सुविधा मिळाल्या पाहिजे. छोट्या मोठ्या कामांसाठी त्यांना गावाबाहेर जाण्याची गरज भासू नये, यादृष्टीने महाराष्ट्र शासन वाटचाल करीत आहे. प्रशासन लोकाभिमूख करण्यासोबतच ग्रामीण जनतेला दिलासा देण्यासाठीच ई-प्रशासनावर जोर देण्यात येत असून ई-बँकींग हा त्यातला महत्वाचा भाग आहे. ग्रामपंचायतींमध्ये ई-बँकींग सेवा सुरु होणे ग्रामीण महाराष्ट्राच्यादृष्टीने अतिशय महत्वाचे पाऊल असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केले.
जिल्ह्यातील परसोडी बु. येथील ग्रामपंचायतीमध्ये ई-बँकींग सुविधेचे उद्घाटन श्री.पाटील यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. परसोडी ही ई-बँकींग सुविधा देणारी देशातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. परसोडी सोबतच यवतमाळ जिल्ह्यातील 200 ग्रामपंचायतीमध्ये ई-बँकींग सेवेचा शुभारंभ झाला. शुभारंभा प्रसंगी अजिक्य जगताप या युवकाने ई-बँकींगव्दारे पाचशे रुपये आपल्या खात्यात जमा केले. त्याची पावती ग्रामविकास मंत्र्यांनी यावेळी त्याला सुपुर्द केली.
उद्धाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा.वसंत पुरके तर प्रमुख पाहुणे म्हणून खा.भावना गवळी, आ.संदीप बाजोरीया, आ.वसंतराव खोटरे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एस.एस.संधू, उपसचिव एकनाथ मोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रविण देशमुख, अमरावती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा ठाकरे, बुलडाणा जिपच्या अध्यक्षा वर्षाताई वानरे, गडचिरोलीच्या अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, नागपूरच्या अध्यक्षा संध्याताई गोतमारे, वर्धाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, अकोल्याचे अध्यक्ष शरद गवई, वाशीम जिपचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, बुलडाणाचे उपाध्यक्ष पांडूरंग पाटील, ठाणे जिपचे उपाध्यक्ष इरफान भुरे, यवतमाळ जिपचे सभापती सुभाष ठोकळ, मनमोहनसिंह चव्हाण, प्रभाकर उईके, प्राजक्ता मानकर, माजी आमदार राजू तिमांडे, केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे राज्य सदस्य अविनाश देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, बँक ऑफ बडोदाचे जनरल मॅनेजर किशोर खरात, सीईओ भगवान गाडगे आदी उपस्थित होते.
अलिकडे माहिती तंत्रज्ञानाने क्रांती केली. शहरातील शिक्षीत वर्गाने या क्रांतीचा उपयोग करुन घेतला. बंगलोरसारख्या शहरात अगदी कमी वयात संगणक क्षेत्रात नोकऱ्या मिळवणारे युवक चांगले पगारदार बनले. माहिती तंत्रज्ञानाची ही क्रांती ग्रामीण भागातही पोहचली पाहीजे. त्यादृष्टीनेच काही वर्षात राज्याशासन प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच 28 हजार गावात संगणक पोहचले. राज्यात ई-पंचायत सुरु झाली. केंद्र शासनाने त्याचा गौरव केला. लोकांपर्यत त्यांच्या हक्काच्या सुविधा पुरविण्यासाठीच ही धडपड आहे. यवतमाळ सारख्या जिल्ह्यात ग्रामपंचायत असलेल्या गावातही बँकांची शाखा नाही. आपल्या कामांसाठी लोकांना लांबवर दुसऱ्या गावी जावे लागते. प्रत्येक गावात बँकेची शाखा त्वरीत उघडणे शक्य नाही. त्यामुळेच गेल्या काही दिवसांच्या प्रयत्नांमुळे ई-बँकींग प्रणाली अस्तित्वात आली असल्याचे पुढे बोलतांना श्री.पाटील यांनी सांगितले.
ई-बँकींग सुविधा राबविण्यासाठी 27 राष्ट्रीयकृत बँकांसोबत शासनाने करार केला आहे. त्यामुळे आता गावातच नागरिकांना बँकेचे खाते उघडता येईल. आर्थिक व्यवहार करता येईल. कर्ज प्रकरणे मंजूर करण्यासोबतच कर्जाची रक्कमही ई-बँकींगच्या माध्यमातून ग्रामपंचायतीतूनच काढता येतील व जमाही करता येईल. भविष्यात मोबाईल, टेलिफोन, वीज बिलाचा भरणा करण्यासोबतच रेल्वे व बसचे आरक्षणही आपल्याच गावात ई-बँकींगव्दारे होणार आहे. आता छोट्या मोठ्या कामांसाठी नागरिकांना बाहेरगावी जावे लागणार नाही, असे ग्रामविकासमंत्री म्हणाले.
जगातील सुविधा सामान्यांच्या घरापर्यंत पोहचवीणे राज्याकर्त्यांचे काम आहे. या सुविधा पोहचविण्यासाठी येणारे अडथळे आम्ही दुर करतो आहे. ई-बँकींगसाठी काही ठिकाणी इंटरनेट कनेक्शनचा प्रश्न उद्भवू शकतो, त्यासाठी ऑप्टीकल फायबर ठिकठिकाणी टाकले जाणार आहे. त्यामुळे ही अडचणही भविष्यात राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. राज्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत ग्रामपंचायतींचे गट करुन येथील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ठराविक रक्कम शासन देणार आहे. सरपंचांच्या मानधन वाढीचाही प्रश्न आहे. त्यावरही लवकरच योग्य पर्यांय काढू, असे ग्रामविकास मंत्री म्हणाले.
यावेळी विधासनसभा उपाध्यक्ष प्रा.वसंत पुरके यांचेही भाषण झाले. ई-बँकींगसेवेमुळे  महिलांना खऱ्या अर्थाने फायदा होणार आहे. ही सुविधा ग्रामीण भागासाठी क्रांतीकारी पाऊल ठरेल. बचतीला प्रोत्साहन देण्यासोबतच पारदर्शकता वाढीस लागेल, असे सांगून या सुविधेची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. खा.भावना गवळी, आ.संदीप बाजोरीया, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रविण देशमुख, अमरावतीच्या अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांचीही यावेळी भाषणे झाली. प्रास्ताविक प्रधान सचिव एस.एस.संधू यांनी केले. ग्रामपंचायतीत बँक हे स्वप्न साकार झाले असल्याचे ते म्हणाले. भविष्यात विविध प्रकारचे अनुदान ई-बँकींगव्दारे वितरीत केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× two = 6