
यवतमाळ, दि. 1 : पारंपारिक शेतीत खर्च अधिक आणि त्या तुलनेत उत्पन्न कमी अशी स्थिती आहे. त्यामुळे अनेक शेतकरी वेगवेगळ्या पिकांकडे वळत आहे. काही शेतकरी फळपिके, भाजीपाला तर काही हळद, अद्रक तर काही डाळींब, पपई यासारख्या पिकांना पसंती देत आहे. गेल्या काही वर्षात अनेक शेतकरी या प्रयोगशिल शेतीतून आर्थिकदृष्ट्या समृध्द झाले आहे. महागाव तालुक्यातील बिजोरी येथील अशाच एका शेतकऱ्याने हळदीचा प्रयोग यशस्वी राबवून यातून वार्षिक 3 लाखाच्या निव्वळ उत्पन्नाची किमया गाठली आहे.
कापुस, सोयाबिन यासह तुर, गहु, ज्वारी ही पारंपारीक पिके गेल्या काही वर्षात प्रचंड खर्चीक झाली असून त्यातून मिळणारे उत्पन्न तुलनेत कमी आहे. लागवड खर्च, मजूरी, रासायनीक खते, बि-बियाने याचा खर्च प्रचंड वाढल्याने तसेच निसर्गाच्या लहरीपणाने ही पिके शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यातुनच शेतकरी शाश्वत उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळत असल्याचे चित्र जिल्ह्यात गेल्या काही वर्षात पाहावयास मिळत आहे.
यातूनच अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग करीत असल्याचे दिसते. महागाव तालुक्यातील बिजोरा येथील देविदास मोहकर व रामदास मोहकर हे भावंड जिल्ह्यातील असेच प्रयोगशिल शेतकरी आहे. या भावंडाने चार वर्षापूर्वी हळदीचा प्रयोग आपल्या शेतात राबविला. पहिल्याचवर्षी चांगले उत्पन्न मिळाल्याने त्यावर्षीपासून ते दरवर्षी किमान दोन एकर क्षेत्रात हळदीची लागवड करते. यातून त्यांना दरवर्षी सर्व खर्च वजा जाता सरासरी 3 लाख रूपये निव्वळ नफा शिल्लक राहते.
यावर्षीही त्यांनी दोन एकर क्षेत्रात हळदीची लागवड केली होती. यावर्षी मान्सूनने दगा दिला. जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट कोसळले परंतु त्यांनी आपल्या शेतात निर्माण केलेल्या सिंचनाच्या सोईमुळे त्यांना यावर्षीही तब्बल 200 क्विंटल इकक्या ओल्या हळदीचे उत्पन्न आझे. सदर हळद सुकविल्यानंतर साधारणेपणे ती 40 क्विंटल इतकी भरण्याची शक्यता आहे. सद्या बाजारातील सुक्या हळदीचे दर पाहता 4 लाखाचे एकून उत्पन्न होण्याची शक्यता असल्याचे देविदास व रामदास मोहकर यांनी सांगितले. यातून 1 लाख रूपये खर्च वजा जाता 3 लाख निव्वळ नफा शिल्लक राहतील, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी निव्वळ पारंपारिक शेतीवर अवलंबून न राहता नवनवीन प्रयोग राबविले पाहिजे, असे मोहकर बंधू सांगतात.









