हरारे – कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामन्यात तब्बल ६२ धावांनी शानदार विजय मिळवला. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोनही आघाड्यांवर भारतीय संघाने चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन केले. या विजयासोबतच भारताने तीन सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत आठ बाद २७१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेला केवळ २०९ धावा करता आल्या. भुवनेश्वर कुमारने चार बळी घेत विजयात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. भारताने विजयासाठी ठेवलेल्या २७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संपूर्ण डाव ४९ षटकांत अवघ्या २०९ धावांत संपुष्टात आला. झिम्बाब्वेकडून सलामीवीर छामू चिभाभाने सर्वाधिक ७२ धावा केल्या. मात्र बाकी फलंदाज साफ अपयशी ठरले. तत्पूर्वी, झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि मुरली विजय यांनी साकारलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ५० षटकांत आठ बाद २७१ धावा केल्या. भारताची सुरुवात चांगली झाली. पहिल्या सामन्यात मोठी भागीदारी करण्यात अपयशी ठरलेल्या मुरली आणि रहाणेने दमदार सुरवात करुन दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी रचली. रहाणेने ८३ चेंडूत ६३ धावा केल्या. तर विजयने ९५ चेंडूत ७२ धावा केल्या. पहिल्या सामन्यात शतकी खेळी करणा-या अंबाती रायडूला मात्र या सामन्यात अर्धशतकही पूर्ण करता आले नाही. त्याने केवळ ४१ धावा केल्या. रायडूपाठोपाठ मनोज तिवारी २२ धावा करुन तंबूत परतला. यापूर्वीच्या सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरलेल्या रॉबिन उथप्पाला या सामन्यातही चांगली खेळी करण्यात अपयश आले. त्याने केवळ १३ धावा केल्या. तर अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीने २५ धावा केल्या. पहिल्या ४२ षटकांमध्ये द्विशतक पूर्ण करणा-या भारतीय संघाने अखेरच्या काही षटकांमध्ये झिम्बाब्वेची जोरदार धुलाई केली. शेवटच्या १० षटकांत भारतीय संघाने ७७ धावा ठोकल्या. तर अखेरच्या दोन षटकांत भारताचे तीन गडी बाद करण्यात झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना यश आले. संक्षिप्त धावफलक भारत – आठ बाद २७१(मुरली विजय ७२, अजिंक्य रहाणे ६३, नेविला मदझिवा ४९/४) झिम्बाब्वे – सर्वबाद २०९(चिभाभा ७२, भुवनेश्वर कुमार ३३/४) सामनावीर – मुरली विजय









