मुंबई – हिंदी सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांनी व्याघ्र संरक्षणासाठी काम करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव मान्य केला आहे. यापुढे अमिताभ बच्चन महाराष्ट्राच्या वाघ संरक्षण योजनेचे ब्रॅंड अँबॅसिडर असतील. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांना पत्र लिहून व्याघ्र संरक्षण योजनेचे ब्रँड अँबॅसिडर होण्याचे निमंत्रण दिले होते. वाघांबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करुन व्याघ्र संरक्षण आणि पर्यटनाला चालना मिळावी यासाठी आपण व्याघ्र संरक्षण योजनेचे अँबॅसिडर व्हावे असे मुनगंटीवार यांनी पत्रात म्हटले होते.
Archive for August 10th, 2015
0
अमिताभ महाराष्ट्राचे व्याघ्र संरक्षणाचे अँबॅसिडर
दंगली घडविण्यासाठीच याकूबच्या फाशीचे प्रदर्शन
मुंबई- हिंदु आणि मुसलमान समाजामध्ये तणाव निर्माण व्हावा. त्यातून उसळणा-या दंगलीवर आपली राजकीय पोळी भाजून घेता यावी यासाठीच केंद्रातील नरेंद्र मोदींचे सरकार आणि महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याच्या फाशीचे प्रदर्शन केले, अशी सणसणीत टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी ठाणे येथे केली. मन की बात करणारे नरेंद्र मोदी आता का मौन धरून बसले आहेत, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.
ठाणे येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मुंबईत बॉम्बस्फोट घडवून शेकडो लोकांचे प्राण घेणा-या याकूब मेमनच्या फाशीचे राजकारण का करता? त्याचे प्रदर्शन करतात? आणि प्रसार माध्यमेही त्यांच्याबरोबर वाहवत जातात. याकूब मेमनने कधी नाश्ता केला, त्याने कोणते पुस्तक वाचले. किती वाजता फाशी दिली. नागपूरला विमान निघाले. मुंबईत पोहचले. मिनिटामिनिटाची खबर. कशासाठी दाखवता? कहर म्हणजे याकूबचा भाऊ टायगर मेमन त्याच्या आईशी बोलतो आणि सांगतो ‘मी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही.’ तो जे आपल्या आईशी बोलला तो शब्द अन् शब्द कसा काय छापून येतो. याचा अर्थ कुणी तरी पोलिसांनीच ही माहिती प्रसार माध्यमांपर्यंत पोहचविली असेल. कशासाठी? ही इतकी साधी गोष्ट नाही. हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. याकूबच्या फाशीचे प्रदर्शन पाहून मुस्लीम तरुणांची माथी भडकावीत आणि टागर मेमनची मुलाखत वाचून हिंदू तरुणांची माथी भडकावीत. त्यांच्यात दंगल व्हावी आणि त्या दंगलीच्या आगीत आपली राजकीय पोळी भाजून घेता यावी यासाठीच केंद्र आणि राज्य सरकारने याकूबच्या फाशीचे असे राजकारण केले.
राज्यात भाजपाचे सरकार आल्याने सामान्य माणसाला कोणताही दिलासा मिळालेला नाही. उलट परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे केवळ शोभेचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे हात आणि पाय नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी बांधलेले आहेत. ते स्वत: कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. राज्यातील भाजपा सरकारच्या काळात भ्रष्टाचाराला ऊत आलेला आहे. मला एक सरकारी अधिकारी भेटले होते. त्यांनी सांगितले की गेल्या आठ महिन्यात केवळ शासकीय अधिका-यांच्या बदल्या करण्यासाठी १०० कोटींची उलाढाल झाली. असे सरकार शेतकरी, कष्टकरी आणि मराठी माणसाला काय न्याय देणार? असा सवालही राज ठाकरे यांनी केला.
याकूब मेमनला फाशी दिल्यावर तमाशा बनवून ठेवला, यावरुन असे वाटते की, या सरकारला दंगली हव्या आहेत. इतक्या लवकर या सरकारचे भांडाफोड होईल असे वाटले नव्हते, चांगल्या रन काढण्याऐवजी चिक्की रन काढीत आहेत. बाबासाहेब पुरुंदरे यांच्या नावावर राजकारण सुरु आहे, हे निंदनीय आहे. वय वर्ष ९० असणा-या बाबासाहेबांना राष्ट्रवादी नेते एकेरी नावाने हाक मारतात, तो एक ठाण्याचा वळवळतो आहे. लायकी आहे का बाबासाहेबांबद्दल यांची बोलण्याची. आपल्याकडे कुंपणच शेत खातं आहे. आपलेच अधिकारी परप्रांतीयांना खोटे दाखले देत आहेत. परप्रांतियांना पोसण्याचे काम दुर्दैवाने भाजप सरकार करीत आहे. तिकडे ते नरेंद्र मोदी गप्प बसतात, कसली मन की बात. मोदी म्हणजे शेवटची आशा आहे, पण तेच जर गुजरातचा जप करतात. मोदी आणि शहा सत्तेत आल्यापासून गुजराती समाजाला कसलं फेफडं आलं आहे? नॉनव्हेज खाण्यास बंदी, गुजराती समाजातील नागरिकांची ही कोणती जबरदस्ती, असा सवाल राज यांनी यावेळी केला. जिथे अन्याय दिसेल तिथे लाथ मारलीच पाहिजे, असे आवाहन राज यांनी कार्यकर्त्यांना केले.माझी आणि उद्धवची भेट झाल्याची बातम्या पुरविल्या जात आहेत, भेट नाही, गाठ नाही… यांच्या राजकारणासाठी ‘या’ बातम्या पुरवल्या जात आहेत, असेही राज यांनी स्पष्ट केले.
झारखंड मंदिरात चेंगराचेंगरी : ११ भाविक ठार
रांची, दि. १० – झारखंडमधील देवघर जिल्ह्यात मंदिरात चेंगराचेंगरी होऊन ११ भाविक ठार तर ५० जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
देवघर जिल्ह्यातील बेलाबागन येथील वैद्यनाथ मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त पहाटे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. जलाभिषेकासाठी कावडवाले रांगेत उभे असताना काही भाविकांनी रांग तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केल्याने धक्काबुक्की झाली. ज्याचे रुपांतर चेंगराचेंगरीत होऊन ११ भाविकांना आपले प्राण गमवावे लागले तर ५० जण जखमी झाले.
मंदिराचा दरवाजा उघडल्याची अफवा पसरल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिकी मिळत आहे.
दरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमींमा ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
0
पॉर्न साईट्सवर बंदी शक्य नाही – केंद्राची कबुली

नवी दिल्ली, दि. १० – पोर्नोग्राफी किंवा अश्लील सिनेमे दाखवणा-या वेबसाईट्सवर सरसकट बंदी घालता येणार नाही अशी कबुली केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिली आहे. पॉर्न साईट्सवर केंद्र सरकारने गुपचूर बंदी घातल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात विरोधी सूर व्यक्त झाला होता. त्यानंतर सरकारने केवळ मुलांचा समावेश असलेल्या पॉर्न साईट्सना बंदी असल्याचा खुलासा केला.
या संदर्भात दाखल करण्यात येणा-या याचिकेवर सोमवारी सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करता येणार नसल्याचे सांगत बंद खोलीमध्ये सज्ञान नागरिकांनी इंटरनेटवर काय बघावे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असून त्यात हस्तक्षेप करता येणार नाही हे सांगतानाच आम्ही प्रत्येकाच्या बेडरूममध्ये उपस्थित राहू शकत नाही अशा शब्दांत भारताच्या अॅटर्नी जनरलनी पॉर्न बंदीस असमर्थता दर्शवली आहे. यामुळे पॉर्न साईट्स पुन्हा पहिल्यासारख्या उपलब्ध असतील असा दिलासा आंबटशौकिनांना मिळालेला आहे. सुप्रीम कोर्टाने सरकारच्या या खुलाशानंतर सुनावणीला तीन महिन्यांसाठी स्थगिती दिली आहे.
0
वाहतूक पोलीसालाच पळवण्याचा प्रयत्न

पुणे, दि. १० – वाहतूक सुरळित ठेवण्याचं तसेच चालकांना शिस्त लावण्याचं काम करणा-या वाहतूक पोलीसालाच पळवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार पुण्याच घडला आहे. मयूर मंडले हे वडगाव पुलाजवळ आपली ड्युटी करत होते. त्यावेळी एका कारला त्यांनी थांबवले, व कागदपत्रांची विचारणा केली. कुठलही कागदपत्रे देण्यास चालकाने नकार दिल्यामुळे कंडले गाडीत बसले आणि त्यांनी गाडी पोलीस स्टेशनला घेण्यास सांगितले. यावेळी या गाडीच्या चालकाने गाडी भरधाव वेगात मुंबईच्या दिशेने दामटली आणि मंडले यांनाच मारहाण करण्याची धमकी दिली. मंडले यांनी प्रसंगावधान राखून वॉकीटॉकीवरून हा प्रकार आपल्या सहका-यांना कळवला. लगेच त्यांच्या सहका-यांनी दुस-या गाडीतून या कारचा पाठलाग केला आणि त्यांना चांदणी चौकाजवळ पकडले. या गाडीतल्या दोघाजणांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.









