Archive for December, 2013
0
स्पेशल रिपोर्ट
लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीला प्राधान्य
नवी दिल्ली- लोकपाल कायद्याची अंमलबजावणी करणे तसेच इतर भ्रष्टाचारविरोधी चार विधेयके मंजूर करण्याला केंद्र सरकार प्राधान्य देणार असल्याची माहिती कार्मिम विभागाचे राज्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी दिली.लोकपाल कायद्याचे नियम सर्वांना सूचित करण्यात आले असून लोकपालचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे ते म्हणाले.भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवणा-यांच्या संरक्षणासाठीचे विधेयक, भ्रष्टाचाराला प्रतिबंध घालणारे सुधारित विधेयक, नागरिकांची सनद विधेयक आदी विधेयके सध्या संसदेत मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. ही विधेयके संसदेच्या आगामी अधिवेशनात मंजूर करवून घेतले जातील, अशी ग्वाही काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी यापूर्वीच दिली असल्याचे ते म्हणाले. संसदेचे अधिवेशन ५ ते २१ फेब्रुवारीपर्यंत भरवण्यात येणार आहे.
यवतमाळ कॉटन सिटी
यवतमाळ हे जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे. महाराष्ट्रातील कापूस उत्पादक जिल्ह्यांपैकी एक महत्वाचा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. जिल्ह्यात एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी अर्धे अधिक क्षेत्रामध्ये कापूस पिकविण्यात येतो. कापूस हे जिल्ह्यातील महत्वाचे नगदी पिक असून विकसित शेतकरी हे नेहमी सुधारित कपाशीचे पिक घेण्यावर भर देतात. महाराष्ट्र राज्य हे देशातील कापूस उत्पादक राज्यांपैकी एक आहे. एकूण क्षेत्रफळापैकी एक त्रीतीआंश क्षेत्रात कपाशीची लागवड होते.
काँग्रेस व राष्ट्रवादीमुळे शेतकरी बरबाद – खा. हंसराज अहीर
यवतमाळ : सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीने जिल्ह्यातील शेतकर्याला बरबाद केले आहे. संकटात असलेल्या शेतकर्यांकडे दुर्लक्ष करत भ्रष्ट काँग्रेस-राष्ट्रवादीत कमिशनवरून वादावादी सुरू आहे. अशा सत्ताधार्यांना धडा शिकवा, असे आवाहन भाजपचे खासदार हंसराज अहीर यांनी केले.
आर्णी तालुक्यातील तरोडा येथून १५ डिसेंबर रोजी निघालेल्या शेतकरी पदयात्रेचा आज दुपारी यवतमाळातील एलआयसी चौकात समारोप करण्यात आला. यावेळी खासदार हंसराज अहीर म्हणाले, सत्ताधारी शेतकर्याला मुबलक वीज आणि पाणी देण्यात अपयशी ठरले आहे. या शासनाला कुणीही माझ्या मुलाला खिचडी द्यावी, असा अर्ज केला नाही. शेतकर्यांच्या मनगटात उत्पादन घेऊन मुलाला शाळेत डब्बा देण्याची ताकद आहे. मात्र हे सरकार शेतमालाला कमी भाव, अतिरेकी भारनियमन आणि सिंचन प्रकल्प अर्धवट ठेवून अडचणीत आणण्याचे काम करत आहे. आज महाराष्ट्राची यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येच्या सत्रामुळे देशात नाचक्की झाली आहे. बाभूळगाव येथे सिंचन परिषदेसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी रखडलेल्या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यावर भाष्य करण्याऐवजी पर्यटन विकासाला दहा कोटी देत असल्याची केविलवाणी घोषणा केली. अशा निर्ढावलेल्या सत्ताधार्यांना धडा शिकविण्याचे आव्हान खासदार अहीर यांनी केले.यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, माजी आमदार मदन येरावार, दिवाकर पांडे, नगराध्यक्ष योगेश गढीया, मनोज इंगोले, अशोक उईके, उद्धवराव येरमे, बाजार समिती सभापती सूर्यकांत गाडे, चंद्रकांत गाडे, भाजपाचे संघटक श्रीकांत देशपांडे, रवींद्र भुसारी आदी उपस्थित होते. या सभेत माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे यांनी सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीवर सडकून टिका केली. आता दोन्ही पक्षांकडून परस्परांवरच गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. ही दुर्दैवी बाब आहे. आतापर्यंंत संकटात असलेल्या शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कधीच काँग्रेस वा राष्ट्रवादीने मोर्चा काढला नाही. राज्यात ७२ कोटींचा सिंचन घोटाळा करणार्या राष्ट्रवादी व काँग्रेसमधील नेत्यांना पैशाची मस्ती चढली आहे. त्यांना सत्तेतून उखडून फेका, असे आवाहन राजाभाऊ ठाकरे यांनी केले. यानंतर जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, चंद्रकांत गाडे, रवींद्र भुसारी, माजी आमदार मदन येरावार, दिवाकर पांडे आदींनी मार्गदर्शन केले. सभेचे संचालन भाजपा उपाध्यक्ष राजू पडगिलवार यांनी केले. यावेळी मोठय़ा संख्येने शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते.
0
नेर नगराध्यक्षपदी सेनेचे पवन जयस्वाल, तर उपाध्यक्षपदी मोहन भोयर
नेर : नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे पवन श्यामलाल जयस्वाल तर उपाध्यक्षपदी अपक्ष मोहन गोविंद भोयर यांची निवड झाली आहे. स्वीकृत नगरसेवक म्हणून सेनेचे भाऊराव ढवळे आणि राकॉंचे इरफान अकबानी यांची निवड झाली.
निवडणूक उपजिल्हाधिकारी ज्ञानेश भट आणि मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या उपस्थितीत या पदांसाठी निवड प्रक्रिया घेण्यात आली. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेतर्फे पवन जयस्वाल आणि उपाध्यक्षपदासाठी अपक्ष मोहन भोयर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. राकॉं व कॉंग्रेसतर्फे नगराध्यक्ष पदासाठी सुभाष भोयर तर कॉंग्रेसचे म.महेफूज यांनी उपाध्यक्ष पदासाठी नामांकन भरले. मात्र शिवसेनेचे संख्याबळ ११ असल्याने जयस्वाल आणि भोयर विजयी झाले.
राकॉंचे सुभाष भोयर व म.महेफूज यांना ७ मते मिळाली. लगेचच स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली. सेनेतर्फे भाऊराव ढवळे तर राकॉं तर्फे इरफान अकबानी यांची निवड झाली.
पदाधिकारी निवडीनंतर शिवसेनेतर्फे विजयी मिरवणूक काढण्यात आली. नेर शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पवन जयस्वाल यांनी प्रस्तूत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.या नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने दहा जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवत भगवा फडकाविला होता. आज पवन जयस्वाल यांची नगराध्यक्षपदी निवड होताच ढोलताशाच्या गजरात फटाके फोडून आनंद व्यक्त केला.












