Archive for May 3rd, 2015
0
विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्घ यांच्या जयंतीनिमित्त सर्व बौद्घ बांधवांना हार्दिक शुभेच्छा
0
मुंबईचा पंजाबवर २३ धावांनी दणदणीत विजय

मोहाली- आयपीएलच्या आठव्या हंगामात मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर २३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मुंबईने विजयासाठी ठेवलेल्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने २० षटकांत सात बाद १४९ धावा केल्या.
किंग्ज इलेव्हन पंजाबची सुरुवात खराब झाली. सलामीवीर विरेंद्र सेहवाग झटपट बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेला ग्लेन मॅक्सवेलही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याला जगदीश सुचितने बाद केले. मुरली विजयने डेव्हिड मिलरसोबत मिळून ४८ धावांची भागीदारी रचली. मात्र विजय ३९ धावा करून बाद झाला. त्याला हरभजन सिंगने बाद केले. त्यानंतर मिलर (४३) बाद झाला. तर जॉर्ज बेली (२१) आणि अक्षर पटेल धावबाद होऊन तंबूत परतले.
मुंबईकडून लसिथ मलिंगाने दोन तर हरभजन आणि जगदीश सुचितने प्रत्येकी एक गडी बाद केला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सने सलामीवीर लेंडल सिमेन्स आणि पार्थिव पटेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने २० षटकांत तीन बाद १७२ धावा केल्या.
मुंबईच्या सलामीवीरांनी सुरुवात दमदार केली. पटेल आणि सिमेन्स यांनी १११ धावांची सलामी दिली. करणवीर सिंगच्या चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात पार्थिव बाद झाला. त्याने ३६ चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५९ धावा केल्या.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार रोहित शर्माने सिमेंन्ससोबत मिळून ४३ धावांची भागीदारी केली. रोहितला मिशेल जॉन्सनने तंबूचा रस्ता दाखवला. त्याने २६ धावा केल्या. त्या पाठोपाठ सिमेन्स बाद झाला. सिमेन्सने ५६ चेंडूत ७१ धावांची खेळी केल्याने मुंबईला १७२ धावांपर्यंत पोहचण्यात मोलाची भूमिका बजावली.त्यानंतर फलंदाजीला आलेले केरॉन पोलार्ड (७) आणि अंबाती रायडू (४) हे नाबाद राहिले. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून अनुरीत सिंग, मिशेल जॉन्सन, करणवीर सिंग यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
0
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण

नवी दिल्ली- दिल्लीत रविवारी झालेल्या शानदार सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘कोर्ट’ला सुवर्णकमळाचा बहुमान मिळाला. तर अन्य सहा पुरस्कारांवरही मराठी चित्रपटांनी आपली मोहोर उमटवली.
‘कोर्ट’ चित्रपटाला सुवर्णकमळासोबतच चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक यांना प्रत्येकी अडीच लाख रुपये, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. ‘किल्ला’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटतर ‘एलिझाबेथ एकादशी’ला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट पुरस्काराने गौरव करण्यात आला.
हिंदीमध्ये ‘क्वीन’ अभिनेत्री कंगना राणावत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. तसेच ‘मेरी कोम’ या चित्रपटाला लोकप्रिय पुरस्कार दिला. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
तर मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ अभिनेते शशी कपूर यांना जुहू येथील निवासस्थानी प्रदान करण्यात येणार आहे.
‘देऊळ’ या मराठी चित्रपटाने २०१२ मध्ये सुवर्णकमळ पटकावले होते. त्यानंतर तीन वर्षांनी हे भाग्य ‘कोर्ट’ या चित्रपटाने पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीला मिळवून दिले आहे.
0
घाटंजीत आयपिएल क्रिकेट सट्ट्यावर धाड
यवतमाळ , दि. ३ – सध्या आयपिएल क्रिकेटची धुम सुरू असून क्रिकेट सट्टाही तेजीत आहे. घाटंजी येथे क्रिकेट स्पर्धेत अनेकांनी सट्टा लावल्याची टिप मिळताच घाटंजी येथील सट्ट्यावर धाड टाकुन दोन आरोपींना अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने शनिवारी रात्री घाटंजी येथील दुर्गा माता वार्डात ही कारवाई केली.
अजय नानाजी अक्कलवार (३८) , जाफर खान ईमान खान पठाण (३३) सर्व रा. दुर्गा माता वार्ड घाटंजी अशी आरोपींची नावे आहे. शुक्रवारी रात्री सरनाईज हैद्राबाद विरूद्घ चन्नई सुपर किंग यांचा दरम्यान क्रिकेट सामना सुरू होता. या सामन्यावर सट्टा सुरू असल्याची टिप स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने दुर्गा माता वार्ड घाटंजी येथील अक्कलवार यांच्या घरी वरच्या मजल्यावर धाड टाकली. यावेळी अजय अक्कलवार, जाफर खान या दोघांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून एलसीडी, सेटअप बॉक्स, १० मोबाईल, रिमोट, अन्य साहित्य व नगदी ३ हजार ७०० रुपये असा एकुण ६१ हजार ७०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तसेच हार-जीत जुगार लिहीलेल्या चिठ्याही जप्त केल्या. या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी आरोपीविरूद्घ ४,५ मुंबई जुगार कायदया अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. ही कारवाई अपर पोलीस अधिक्षक जे.बी. डाखोरे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुगत पुंडगे, सहाय्यक फौजदार भिमराव सिरसाट, डोंगरे, पोलीस शिपायी नितीन सलाम, भोजराज करपते, चालक सतीश गजभिये यांनी केली.
0
वरिष्ठाची हत्या करून पोलिसाची आत्महत्या

मुंबई : वाकोला पोलीस ठाण्याच्या साहाय्यक फौजदाराने सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून वरिष्ठ निरीक्षक आणि त्यांच्या वायरलेस आॅपरेटर शिपायावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. दरम्यान, या गोळीबारात वरिष्ठ निरीक्षक विलास जोशी यांचेही इस्पितळात उपचार सुरू असताना निधन झाले.
ही घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास पोलीस ठाण्यातच घडली. गोळीबार करणाऱ्या साहाय्यक फौजदाराचे नाव दिलीप शिर्के आहे. स्वत:वर गोळी झाडून घेतल्याने त्यांचा मृत्यू व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करून घेण्याआधीच झाला. वरिष्ठ निरीक्षक विलास जोशी आणि त्यांचा वायरलेस आॅपरेटर बाळासाहेब अहिरे या दोघांना लीलावती रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, जोशी यांच्या पाठीत शिरलेली गोळी यकृताला छेदत पोटातून बाहेर पडली. त्यामुळे रात्री उशिरा विलास जोशी यांचे निधन झाले. अहिरे यांच्या मांडीत गोळी घुसली आहे. या घटनेने सुन्न झालेल्या वाकोला पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली. रात्री उशिरापर्यंत घटनेचा पंचनामा सुरू होता. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. शिर्के यांनी हे पाऊल का उचलले, त्यांना याआधी वरिष्ठ निरीक्षक जोशी किंवा अन्य वरिष्ठांकडून जाच होता का, याबाबत गुन्हे शाखा तपास करणार आहे. शिर्के यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून (९एमएम) तीन गोळया झाडल्या. हे रिव्हॉल्वर पुढील तपासासाठी हस्तगत करण्यात आले आहे.
0
१ ऑगस्टपासून एलबीटी हटविणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

नागपूर – येत्या १ ऑगस्ट २०१५ ला एलबीटी हटविणार तसेच एलबीटी आंदोलनादरम्यान ज्या व्यापाऱ्यांवर नोव्हेंबर २०१४ पर्यंत दाखल झालेले गुन्हे परत घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते नागपुरात नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित सत्कार समारंभात बोलत होते.
फ्रान्स आणि जर्मनीच्या दौऱ्यात तेथील उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले असल्याचंही फडणवीसांनी सांगितले. त्यांनी याबाबत उत्सुकता दाखवली असून नागपुरात गुंतवणूक करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विदर्भात कृषी आधारित उद्योग सुरू करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या कृषीमालावर उत्पादन करणाऱ्या कंपनीने रशियाच्या कंपनीबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. नागपूर जी. एस. टीचे केंद्र बनेल. विविध प्रकारच्या कंपन्या विदर्भात येणार आहेत. ५ लाख शेतकऱ्यांकडून सरळ माल विकत घेतली. शेतकऱ्यांची ही संख्या २५ लाखांपर्यंत वाढेल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
0
‘दुरांतो’चे १० डबे घसरले

पणजी – एरनाकुलम दुरांतो एक्सप्रेसचे १० डबे आज रुळावरून घसरले. बाली रेल्व स्टेशनजवळील बोगद्यात हा अपघात झाला. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पणजीच्या दक्षिणेला ४५ किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. या अपघातात सुदैवाने जीवितहानीचे वृत्त नाही. घटनास्थळी रुग्णवाहिकेसह वैद्यकीय मदत पोहोचवण्यात आली आहे. कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटे यांनी ही माहिती दिली आहे.
0
नेपाळमध्ये आज पुन्हा भूकंपाचे धक्के

काठमांडू – नेपाळमधील भूकंप काही थांबता थांबेना, आठवड्यापूर्वी ७.९ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाने नेपाळ उद्धवस्त झाले आहे. त्यात आज पुन्हा नेपाळला भूकंपाने धक्के दिले आहेत.
येथील सिंधुपालचौक जिल्ह्यात आज पहाटे ३.२९ च्या सुमारास भूकंपाने धक्का दिला आहे. या भूकंपाची ४.५ रिश्टर तीव्रतेची नोंद झाली आहे. त्याचबरोबर पहाटे ५.५७ वाजता गोरखा आणि धाडिग जिल्ह्याला भूकंपाने ५ रिश्टर तीव्रतेचे धक्के दिले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू धाडिग जिल्ह्यात होता.भूकंपाचे धक्के थांबत नसल्याने नेपाळमधील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. मात्र, अधिक चिंता करू नये, असे हवामान खात्याने आवाहन केले आहे.













