आर्णी – घरातील भुयाराचे जागेत खोदकाम करुन गुप्तधन काढल्याचे अफवेने खंडाळा येथे चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली. खंडाळा येथे रात्री ९ वाजताच्या दरम्यान एका पोलीस पाटाच्या घराच्या आवारात खोदकाम सुरू आहे. यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात गुप्तधन सापडल्याची माहीती गावातील नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यावरुन डीबी पथकाने घटनास्थळ गाठुन भुयारा जवळ सात ते आठ फुट खोल खोदकाम करुन असल्याचे दिसले. तसेच पुजापातीचे सामान व सात ते आठ जण यावेळी पोलिसांना आढळले. त्यांनी या सर्वांना ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. रात्री व सकाळी त्यांची कसून चौकशी करून ठाणेदारांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणाविरुद्घ प्रतिबंधात्मक कारवाई केली. सध्या खंडाळा गावात ग्रामपंचायत निवडणूक असल्याने विरोधकांनी अफवा परसवून पोलीसांना माहिती दिल्याचे त्या पाटलाचे म्हणने आहे. डीबी पथकाने गुप्तधन प्रकरणातही पाटलावर दबाव टाकुन मोठी डील केल्याची चर्चा आहे.
Archive for July 12th, 2015
शेतकºयाची आत्महत्या
पांढरकवडा – निसर्गाच्या लहरिपणामुळे तालुक्यातील वाढोडा येथील शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी ११ जुलै रोजी दुपारी २ वाजता घडली. शालीक चंपत गेडाम (४१) रा. वाढोडा असे मृतकाचे नाव आहे. गेडाम यांच्या वडीलाच्या नावे गट नं. २९/११ मध्ये ०.०२ हेक्टर आर जमीन आहे. त्याचेवर अडणी येथील सोसायटीचे १० हजार ८७६ रुपये कर्ज आहे. मृगनक्षत्रात पाऊस बरसल्याने शेतकºयांनी शेतात बियाणे लागवड व पेरणी केली होती. मात्र तब्बल २० दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पिक करपल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे गेडाम सतत विवंचनेत राहत होता. दरम्यान दोन दिवसापासून तो घरुन बेपत्ता झाला होता. नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली असता शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्याच्या मागे पत्नी, तीन मुली, १ मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे. याप्रकरणी मृतकचे जावाई सुरेश महादेव मेश्राम रा. सायखेडा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
बंधाºयात बुडून बालकाचा मृत्यू
नेर – पोहायला गेलेल्या बालकाचा बंधाºयात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी ११ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडली. पियुष गजानन शिंदे (१३) रा. खरडगाव असे मृतकाचे नाव आहे. शाळेला सुट्टी असल्याने आज रविवारी तो आपल्या मित्रासोबत बंधाºयात पोहायला गेला होता. अशातच त्याचा पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या बाबतची माहिती त्याच्या मित्रांनी गावकºयांना दिली. या घटनेची माहिती मिळताच नेर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह बाहेर काठून उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. यापूर्वी अजंती येथे बंधाºयात बुडून एका बालकाचा मृत्यू झाला असून ही दुसरी घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.
जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीचा विशेष पथदर्शी कार्यक्रम घोषित
पालकमंत्री संजय राठोड यांच्या पाठपूराव्याला यश
यवतमाळ, दि. 12 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासोबतच शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा प्रभावीपणे लाभ देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अतिशय महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना मदतीचा विशेष पथदर्शी कार्यक्रम राबविण्यासोबतच बळीराजा चेतना अभियान, सिंचनासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री संजय राठोड यांनी यासाठी सातत्याने पाठपूरावा केला होता.
आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत केवळ यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी हा महत्वपुर्ण कार्यक्रम घोषित करण्यात आला असून यामुळे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम राबविण्यासाठी शासनाकडे विविध प्रस्ताव आपण सादर केले होते. यातील बहुतांश प्रस्तावांचा स्विकार होवून हा कार्यक्रम घोषित झाला असल्याचे ते म्हणाले. आज घोषित करण्यात आलेला कार्यक्रम तिन वर्षासाठी दोन जिल्ह्यात राबविला जाईल. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या प्रमुखतेत विशेष कक्ष स्थापन केल्या जाणार आहे. हा कक्ष शासनाच्या शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे समन्वयन करुन या योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना देण्यासाठी काम करणार आहे. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना किंवा धोरनात्मक बाबींमध्ये बदल आवश्यक असतील तर या कक्षाच्या माध्यमातून असे बदल परस्पर करण्याचे अधिकार विभागनिहाय नेमण्यात आलेल्या सचिवस्तरीय सात अधिकाऱ्यांना आजच्या निर्णयान्वये देण्यात आले आहे. जिल्हास्तरावरील हा कक्ष कार्यक्रमाच्या अंमलबजावणी सोबतच शेतकरी योजनांचे समन्वयन व आत्महत्याग्रस्तांचा सर्वे, योजनांची माहिती, सामुहिक भजन किर्तनाव्दारे जनजागृती व ग्रामसमित्यांचा आढावा घेण्याचे काम करतील. या समितीत जिल्हाधिकारी अध्यक्ष तर निवासी उपजिल्हाधिकारी सदस्य सचिव राहतील. मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षकांसह जिल्ह्यातील महत्वपूर्ण अधिकाऱ्यांचा सदस्य म्हणून समितीत समावेश राहणार आहे. ही समिती जिल्हा नियोजन समितीला उत्तरदायी राहतील. पालकमंत्री वेळोवेळी समितीच्या कामकाजाचा आढावा घेतील. समितीच्या कामकाजासाठी शासनाने 10 केाटी रुपयेही आजच्या बैठकीत मंजूर केले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
ग्रामस्तरावरही सरपंचांच्या अध्यक्षतेत समित्या स्थापन केल्या जातील. गावातील प्रमुख शासकीय कर्मचाऱ्यांसह गावात असल्यास डॉक्टर, वकील तसेच बचतगट अध्यक्ष या समितीत राहतील. ग्रामसमितीला कार्यक्रम राबविण्यासाठी प्रत्येकी 1 लाख रुपये या प्रमाणे जिल्ह्यातील 1207 ग्रामपंचायतींसाठी 12 कोटी 7 लक्ष रुपयेही मंजूर करण्यात आले आहे. विशेष प्रसंगी आजारपण किंवा कर्ज परतफेडीचा एक हप्ता भरण्यासोबतच जनजागृतीसाठी ही रक्कम वापरता येईल. शासनाने आत्महत्या थांबविण्यासाठी जिल्ह्यात सात उपविभागात सात सचिव दर्जाचे अधिकारी नेमले आहे. शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांमध्ये उणीवा असल्यास त्या परस्पर दुरुस्त करण्याचे अधिकार या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. जिल्ह्यात आत्महत्या झाल्यास सदर आत्महत्या थांबविता आली नसती का या बाबतची कारण मिमांसा करुन पंधरा दिवसात सदर सचिवांना मुख्यमंत्र्यास अहवाल सादर करावा लागतील. तशी बाब आजच्या निर्णयात नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी बळीराजा चेतना अभियानाची घोषणाही करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी नाटक, प्रवचन, पथनाट्य, किर्तन, पोवाडे आदीव्दारे जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जातील. पालकमंत्री या अभियानाचे अध्यक्ष राहणार असून जिल्हधिकारी सदस्य सचिव तर बहुतांश सर्व अधिकारी सदस्य राहतील. अभियानाअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कारही देण्यात येणार आहे.
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत बळीराजा चेतना अभियान
सिंचनासाठी तीन वर्षात 687 कोटी सिंचन प्रकल्पांव्दारे शेतकऱ्यांना ओलीताची सोय उपलब्ध करुन देण्याअंतर्गत जिल्ह्यातील सोळा प्रकल्पांना या वर्षासह पुढील तिन वर्षात 687 केाटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. या वर्षी 198 कोटी रुपये दिले जातील. 2016-17 मध्ये 274 कोटी तर 2017-18 मध्ये 213 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले जाणार आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांची आर्थीक स्थिती चांगली नाही. त्यामुळे त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम जाणविण्याची शक्यता आहे. अशा शेतकऱ्यांना धिर देण्यासाठी जिल्हास्तरावर एक व ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रत्येकी एक कंत्राटीपध्दतीवर मानसोपचार तज्ञ नेमण्यात येणार आहे. चर्चेव्दारे त्यांना मानसिक आधार देण्याचे काम हे मानसोपचार तज्ञ करतील. या नियुक्तीसाठीही आर्थीक तरतूद करण्यात आली असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
0
मुसळधार पावसामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत

नवी दिल्ली – सलग चौथ्या दिवशी कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे राजधानी दिल्लीतील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. पावसाच्या संततधारेमुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.
गेल्या ३६ तासांत दिल्लीत सुमारे २०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी ठिकाणी पाणी साचले आहे. अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विटरवरुन दिली.
पुढील २४ तासांत दिल्लीत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान ढगाळ राहील. अनेक भागात विजांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत दिल्लीत १४७.८ मिमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने सांगितले.
दक्षिण दिल्ली, मध्य दिल्ली आणि पूर्व दिल्लीतील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने त्याचा वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
बिहारमध्ये भिंत कोसळली, तीन ठार
बिहारमधील कैमुर जिल्ह्यात घराची भिंत कोसळल्याने झालेल्या अपघातात एकाच घरातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे.
राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे गेहून गावातील एका घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत एकाच कुंटुंबातील तीन महिला ठार झाल्या तर एक महिला जखमी आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भिंत कोसळल्याच्या दुर्घटनेत तीन ठार
उत्तर प्रदेशमध्ये विविध ठिकाणी भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दहा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.
0
आसाराम प्रकरणातील साक्षीदाराचा गोळीबारात मृत्यू

बरैली(उत्तर प्रदेश) – लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू प्रकरणातील साक्षीदार कृपाल सिंह याचा शनिवारी रात्री मृत्यू झाला.
शुक्रवारी रात्री कृपाल सिंह घरी परतत असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार केला होता. यात तो मोठ्या प्रमाणात जखमी झाला होता. त्याच्यावर बरैली येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.गेल्या काही दिवसांपासून आसाराम यांच्याशी संबंधित लोकांकडून आपल्याला धमकीचे फोन येत होते अशी माहिती कृपाल यांनी आपल्या जबानीत दिल्याचे अतिरिक्त शहर दंडाधिका-यांनी सांगितले.आसाराम प्रकरणातील नऊ साक्षीदारांवर आतापर्यंत हल्ले करण्यात आले. तर तीन जणांचा यात मृत्यू झाला आहे.
0
हरारे – कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामन्यात तब्बल ६२ धावांनी शानदार विजय मिळवला. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोनही आघाड्यांवर भारतीय संघाने चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन केले. या विजयासोबतच भारताने तीन सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत आठ बाद २७१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेला केवळ २०९ धावा करता आल्या. भुवनेश्वर कुमारने चार बळी घेत विजयात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. भारताने विजयासाठी ठेवलेल्या २७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संपूर्ण डाव ४९ षटकांत अवघ्या २०९ धावांत संपुष्टात आला. झिम्बाब्वेकडून सलामीवीर छामू चिभाभाने सर्वाधिक ७२ धावा केल्या. मात्र बाकी फलंदाज साफ अपयशी ठरले. तत्पूर्वी, झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि मुरली विजय यांनी साकारलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ५० षटकांत आठ बाद २७१ धावा केल्या. भारताची सुरुवात चांगली झाली. पहिल्या सामन्यात मोठी भागीदारी करण्यात अपयशी ठरलेल्या मुरली आणि रहाणेने दमदार सुरवात करुन दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी रचली. रहाणेने ८३ चेंडूत ६३ धावा केल्या. तर विजयने ९५ चेंडूत ७२ धावा केल्या. पहिल्या सामन्यात शतकी खेळी करणा-या अंबाती रायडूला मात्र या सामन्यात अर्धशतकही पूर्ण करता आले नाही. त्याने केवळ ४१ धावा केल्या. रायडूपाठोपाठ मनोज तिवारी २२ धावा करुन तंबूत परतला. यापूर्वीच्या सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरलेल्या रॉबिन उथप्पाला या सामन्यातही चांगली खेळी करण्यात अपयश आले. त्याने केवळ १३ धावा केल्या. तर अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीने २५ धावा केल्या. पहिल्या ४२ षटकांमध्ये द्विशतक पूर्ण करणा-या भारतीय संघाने अखेरच्या काही षटकांमध्ये झिम्बाब्वेची जोरदार धुलाई केली. शेवटच्या १० षटकांत भारतीय संघाने ७७ धावा ठोकल्या. तर अखेरच्या दोन षटकांत भारताचे तीन गडी बाद करण्यात झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना यश आले. संक्षिप्त धावफलक भारत – आठ बाद २७१(मुरली विजय ७२, अजिंक्य रहाणे ६३, नेविला मदझिवा ४९/४) झिम्बाब्वे – सर्वबाद २०९(चिभाभा ७२, भुवनेश्वर कुमार ३३/४) सामनावीर – मुरली विजय









