
पुरी- उडिसामधील पुरी येथे भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत शनिवारी चेंगराचेंगरी झाली असून यामध्ये दोन भाविक ठार, तर 14 जण जखमी झाले आहेत. जखमींना कटकच्या रूग्नालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये विजयलक्ष्मी मोहंती (वय 65) या महिलेचा समावेश आहे.
या रथयात्रेत भगवान जगन्नाथ, त्यांचे बंधू भालभद्र आणि बहिण सुभद्रा यांचे तीन रथ असतात. भगवान जगन्नाथाचा रथ ओढणाऱ्या भक्तांना पहांडी असे म्हणतात. बाराव्या शतकापासूनची परंपरा असलेल्या या रथयात्रेला सकाळी मोठ्या थाटात सुरूवात झाली. लाखो भाविक रथ ओढत तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंदिचा मंदिराच्या दिशेने निघाले असताना ही चेंगराचेंगरी झाली आहे.
Archive for July 18th, 2015
0
रथयात्रेत चेंगराचेंगरी होऊन 2 ठार, 14 जण जखमी
0
देशभरात ईद उत्साहात साजरी

नवी दिल्ली – देशभरात रमजान ईद उत्साहात साजरी होत आहे. मुस्लिम बांधवांनी ईदच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छाही दिल्या. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी ट्विटरवरुन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी तसेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ईदच्या शुभेच्छा दिल्या.
ईदच्या निमित्ताने माझ्याकडून शुभेच्छा असे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे. ईद उल फित्र च्या निमित्त मी सर्व देशबांधवांना खासकरुन सर्व मुस्लिम बंधू आणि भगिनींना शुभेच्छा देतो असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.
शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर जामा मशिदीचे इमाम बुखारी यांनी शनिवारी ईद साजरी करण्याबाबतची घोषणा केली. देशातील अनेक मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाजपठणासाठी गर्दी केली होती. ईद उल फित्र’ निमित्त देशभरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
रमजान हा इस्लामिक चांद्र पंचांगातील नववा महिना आहे. या काळात सूर्योदयापासुन सुर्यास्तापर्यंत उपवास करुन रोजा पाळला जातो. महिनाभर रोजे पाळून इंद्रिये आणि मनावर संयम ठेवण्याचा आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात येतो.
0
कुंभारकिन्ही शिवारात ना. रावते व पालकमंत्री राठोड यांनी केली पेरणी

शासन व शिवसेना शेतकऱ्यांना समर्थपणे उभे करणार
यवतमाळ, दि.18 : पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याची अवस्था आणि अस्वस्थता आम्ही समजू शकतो. असे संकटं येतील आणि जातील, परंतु एकदा गेलेला जीव परत येत नाही. त्यामुळे कितीही संकटं आली तरी आत्महत्येचा विचार मनात आणू नका, शासन व शिवसेना पक्ष वैयक्तिकस्तरावर आपल्या सोबत आहे. काय लागेल ती मदत आम्ही करू, असा भावनिक आधार देत, राज्याचे परिवरहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज दारव्हा तालुक्यातील हातणी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी स्व. उत्तमराव चौधरी यांच्या कुंभारकिन्ही शिवारातील शेतात बियाण्यांअभावी रखडलेली पेरणी पूर्ण करून दिली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे प्रामुख्याने उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ना. दिवाकर रावते यांनी अडचणीतील शेतकऱ्यांना विशेषकरून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ‘पेरते व्हा’ असा संदेश देत त्यांना पक्षातर्फे शेतीसाठी सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी अभिनव असे सकारात्मक आंदोलन सुरू केले. 22 जून रोजी यवतमाळ जिल्ह्यातील काही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या सांत्वना भेटी दरम्यान अनुभवलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथांनी अस्वस्थ होऊन ना. दिवाकर रावते व पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्यातील जवळपास 3 हजार 500 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शिवसेना पक्षातर्फे शेतीसाठी सर्वेतोपरी सहाय्य करण्याची घोषणा केली. त्यानुसार पालकमंत्री संजय राठोड यांनी कृषी दिनाचे औचित्य साधून 1 जुलै रोजी यवतमाळ नजीकच्या इचोरी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी अंकूश खडके यांच्या शेतात परेणी करून या उपक्रमाची सुरूवात केली होती. तेव्हापासून जिल्ह्यात शिवसैनिकांमार्फत अनेक शेतकऱ्यांना या प्रकारे मदत सुरू आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसापर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात दारव्हा तालुक्यातील कुंभारकिन्ही शिवारात आज कापूस दिंडीचे प्रणेते, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते प्रत्यक्ष सहभागी झाले होते.
हातणी येथील शेतकरी उत्तमराव चौधरी यांनी 2005 मध्ये कर्जबाजारीमुळे आत्महत्या केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असून यावर्षी पैशाअभावी त्यांची कुंभारकिन्ही शिवारातील चार एकर शेती पडीक होती. ही बाब दारव्हा तालुक्यातील शिवसैनिकांना समजताच या कुटुंबाला मदत करण्यासाठी शिवसैनिक सरसावले. त्यानुसार आज दुपारी ना. दिवाकर रावते, ना. संजय राठोड यांच्या उपस्थितीत चौधरी यांच्या शेतात सोयाबीनची पेरणी करण्यात आली. यावेळी मंदा उत्तमराव चौधरी या महिला शेतकऱ्यासह त्यांचा मुलगा संदीप उपस्थित होते. ना. रावते व ना. राठोड यांनी शेतातील दोन तास पेरून दिले. त्यानंतर ना. संजय राठोड यांनी ट्रॅक्टर चालवून पेरणी करून दिली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना, ना. रावते यांनी, आमचे ‘पेरते व्हा’ हे आंदोलन सकारात्मक स्वरूपाचे असून, अडचणीतील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने त्याच्या घरापर्यंत, शेतापर्यंत जाऊन मदत करण्यासाठी आयोजिलेले आहे. शासन शेतकऱ्यांना मदत करतच आहे, परंतु शिवसेना या पक्षाचीही प्रथम बांधिलकी ही शेतकरी आणि सामान्य माणसांशी आहे. त्यामुळे हे घटक अडचणीत असताना आम्ही स्वस्थ नाही बसू शकत. पक्ष नेतृत्वाच्या आदेशाने आमच्याकडून शक्य ती मदत करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत, असे सांगितले. शेतकरी जगाचा पोषिंदा आहे. त्याला तुमची सहानुभूती नको तर, आपल्या पाठीशी खंबीरपणे कोणीतरी उभे आहे, हा विश्वास हवा आहे. तो विश्वास आम्ही त्यांना देत आहो. ‘घार उडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी’, ही शिवसेनेची शेतकरी हिताची भूमिका ठरली आहे, असेही ते यावेळी म्हणाले. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना स्वयंनिर्भर करण्यासाठी व उपजिविकेचे कायम साधन मिळावे यासाठी अशा कुटुंबांना लवकरच शेळी, गाय, शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार असल्याचे ना. रावते यांनी सांगितले.
शिवसैनिकांनी आमचे पडीक शेत नांगरून, वखरून दिले. पेरणीसाठी बियाणे, खत आणून दिले. बँकेने कर्ज नाकारल्यानंतर शिवसेनेने मदत दिली नसती तर यावर्षी शेती केलीच नसती, अशी प्रतिक्रिया शेतकरी मंदा चौधरी यांनी व्यक्त केली. ना. रावते व ना. राठोड यांनी पेरणी केल्यानंतर शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विनोद चव्हाण, सुधाकर सिंगाते, अनिल खडसे यांनी या शेतातील पेरणी पूर्ण करून दिली. या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुखद्वय विश्वास नांदेकर, संतोष ढवळे, उपजिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, अरविंद गादेवार, दारव्हा तालुका प्रमुख मनोज सिंगी, दिग्रसचे राजकुमार वानखडे, नेरचे गजानन भोकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक सहभागी झाले होते.
मातोश्रीवरून विचारणा
ना. दिवाकर रावते व ना. संजय राठोड हे कुंभारकिन्ही येथे चौधरी यांच्या शेतात पोहचताक्षणीच मुंबई येथून ‘मातोश्री’वरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ना. रावते यांना फोन आला. यावेळी ना. रावते यांनी चौधरी यांचे शेत पडीक कसे राहिले व आता त्या शेतात शिवसैनिकांच्या वतीने काय काय केले जाणार आहे, याची कल्पना दिली. पलिकडून उद्धव ठाकरे यांनीही संबंधित शेतकरी महिलेची आस्थेवाईपणे विचारपूस करून तिला हवी ती मदत द्या, अशा सूचना ना. रावते यांना केल्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ना. संजय राठोड यांच्याशीही संवाद साधून ते करीत असलेल्या उपक्रमाचे कौतूक करीत या उपक्रमात गरजू शेतकऱ्यांच्या मदतीत सातत्य ठेवण्याच्या सूचना केल्या.
0
कृषी सप्ताहाच्या माहितीपटाचे आज सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपण

यवतमाळ, दि. १८ – राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात साजऱ्या झालेल्या कृषी दिनाच्या विविध कार्यक्रमांसह कृषी सप्ताहातील कार्यक्रमांवर आधारित विशेष माहितीपटाचे प्रसारण डीडी सह्याद्री मराठी वाहिनीवरून उद्या दि. १९ जुलै रोजी होणार आहे. सायंकाळी ७.१५ ते ७.३० या वेळात हा माहितीपट प्रसारित करण्यात येणार आहे. माहितीपटात कृषी दिनानिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांनी इचोरी येथे शेतात केलेल्या पेरणी व श्रमदानासह, वैद्यकीय महाविद्यालयास कै. वसंतराव नाईक यांचा पुतळा भेट देण्याचा कार्यक्रम तसेच कृषी विभागाच्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शनासंदर्भात माहिती दाखविण्यात येणार आहे. दूरदर्शनचे प्रतिनिधी आनंद कसंबे यांनी या माहितीपटाचे चित्रिकरण करून निर्मिती केली आहे.
0
शेतकऱ्यांना समर्थपणे उभे करणे हेच शिवसेनेचे ध्येय- ना. रावते

शिवसेनेकडून दारव्हा येथे ६५० कुटुंबांना मोफत बियाणे व खताचे वाटप
यवतमाळ, दि. १८ – समाजाभिमूख आणि सकारात्मक आंदोलनांपासून शिवसेना कधीही दूर जाणार नाही, अशी ग्वाही देत शेतकरी हितासाठी शिवसेनेचे उपक्रम सातत्याने सुरू राहणार आहेत. शेतकऱ्यांना समर्थपणे उभे करणे, हेच शिवसेनेचे पूर्वीपासूनचे ध्येय आहे, असे प्रतिपादन कापूस दिंडीचे प्रणेते, राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. दारव्हा येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबिंयांना मोफत बियाणे व खत वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. दारव्हा येथील निधी मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुखद्वय विश्वास नांदेकर, संतोष ढवळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. रावते म्हणाले की, पावसाअभावी राज्यातील शेतकरी भीषण संकटातून जात आहे. अनेक ठिकाणी पेरणी उलटली, पावसाअभावी पिके करपत आहेत. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. अशा स्थितीत आपल्या पाठीमागे कोणाचीतरी भक्कम साथ शेतकऱ्यांना हवी आहे, आणि ‘पेरते व्हा’ या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेना त्यांच्या सोबत आहे, हेच सांगायला मी आज येथे आलो आहे, असे ते म्हणाले. प्रथम शेतकरी हित ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. पक्षनेतृत्वाच्या भूमिकेला अनुसरूनच राज्यातील शिवसैनिक शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी परिश्रम घेत असल्याचे त्यांनी सांगितले. आत्महत्या करू नका एवढीच कळकळीची विनंती मी शेतकऱ्यांना करतो, अशी भावनिक सादही ना. रावते यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना घातली.
याप्रंसगी बोलताना पालकमंत्री संजय राठोड यांनी, जिल्ह्यात १ जुलैपासून शिवसेनेच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शेतीसंदर्भात सर्वतोपरी मदत करण्याचा उपक्रम सुरू असल्याचे सांगितले. आतापर्यंत जिल्ह्यातील ६० च्या वर शेतकऱ्यांना शिवसैनिकांनी पेरणी करून दिली आहे. शिवसेना सत्तेत नव्हती तेव्हाही, आणि आता सत्तेत असतानाही कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. मात्र संकटकाळात शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा पर्याय निवडून कुटुंबाला उघड्यावर पाडू नये, असे आवाहन ना. संजय राठोड यांनी केले.
आजच्या कार्यक्रमात दारव्हा, दिग्रस, नेर तालुक्यातील ६५० शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर बियाण्यांचे व एसएसपी खताचे वाटप करण्यात आले. यावेळी ना. दिवाकर रावते व ना. संजय राठोड यांच्या हस्ते लक्ष्मी धुरट, माया चव्हाण, कमला राठोड, अनंत राऊत, कमला भोकरे, सतवा चव्हाण, शांता शेरे आदी शेतकऱ्यांना बियाणे व खतांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बियाणे व खतांचे वाटप केले. शिवसेनेतर्फे सर्व शेतकऱ्यांच्या घरी हे बियाणे पोहचवून देण्यात आले. कार्यक्रमात तूर, सोयाबीन व खताच्या प्रत्येकी ६५० बॅग वाटप करण्यात आल्या. या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख श्रीधर मोहोड, प्रवीण शिंदे, अरविंद गादेवार, उमाकांत पापीनवार, राजेंद्र साकला, तालुका प्रमुख मनोज सिंगी, राजकुमार वानखडे, गजानन भोकरे, शहर प्रमुख सुधीर दातीर, संजय चोपडे, रवींद्र भारती, मनोज ढगले, पंडीत राठोड, महिला आघाडी प्रमुख लता चंदेल, जि.प.सदस्य संगीता इंगोले, पं.स.सदस्य माणिक मेश्राम, महिला आघाडीच्या जयश्री मिरासे, साधना वाणी, आशा डोंगरे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख राजू दुधे, गजेंद्र चव्हाण, धनंजय सारखे, रवी तरटे आदी शिवसेना पदाधिकारी, शेकडो शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अजय गाडगे यांनी केले.
0
पुण्यात कॉकटेल पार्टी, 50 मद्यधुंद तरुण-तरुणी अटकेत
पुणे- पुण्यातील आयटी पार्क परिसर म्हणून वेगाने विकसित झालेल्या हिंजवडीजवळील नेरे गावात एका बांधकाम व्यावसायिकाच्या फॉर्म हाऊसवर कॉकटेल रंगलेल्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. नेरे गाव हे हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोडते. हिंजवडी पोलिसांनी या पार्टीची कुणकुण लागताच मध्यरात्री 3 च्या सुमारास धाड टाकली. यावेळी 40-50 तरूण-तरूणी मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. दारूच्या बाटलीचा खच व काही कंडोम्सची पाकिटे मिळून आल्याचे हिंजवडी पोलिसांनी दावा केला आहे.
यात काही महाविद्यालयीन तरूण-तरूणी आहेत तर काही आयआयटीन्स आहेत. पुणे शहरातील एका प्रतिष्ठीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा या पार्टीत सहभाग असल्याचे समोर आले आहे. या सर्व तरूण-तरूणींना पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. दरम्यान, या पार्टीत ड्रग्जचा वापर करण्यात आला आहे काय याचा तपास पोलिस करीत आहेत. या कॉकटेल पार्टीसाठी परवानगी घेतली नसल्याचे हिंजवडी पोलिसांनी सांगितले.
0
आता इंजेक्शन न टोचता घेता येईल लस

इंजेक्शन टोचून घ्यायचे म्हटले की, लहान मुलेच नाही तर मोठय़ांचेसुद्धा हातपाय थरूथरू लागतात. म्हणूनच बर्याचदा इंजेक्शनऐवजी गोळ्यांची मागणी केली जाते. मात्र या समस्येवरचा उपाय शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे. त्यांनी एक अतिशय सूक्ष्म सुई असलेली पट्टी विकसित केली असून ती त्वचेमध्ये सहजपणे मिसळून जाईल. जपानच्या ओसाका विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या अनोख्या प्रकारची पट्टी तयार केली असून वेदनादायी इंजेक्शनला ती पर्याय ठरेल, असा त्यांचा दावा आहे. त्वचेमध्ये मिसळणारी ही पट्टी लसीकरण अधिक सोपे, सुरक्षित आणि कमी वेदनादायी बनविण्यास सक्षम आहे. बहुतांश लस सुईच्या मदतीने त्वचा वा स्नायूंमध्ये दिल्या जातात. ही पद्धत प्रभावी असली तरी त्यासाठी व्यक्ती धिराची व दक्ष असणे गरजेचे असते. कारण सुई घेण्याच्या नावानेच अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. मात्र ही नवी सूक्ष्म सुई असलेल्या पट्टीला विरघळणार्या पदार्थांपासून बनविण्यात आली आहे. त्यामुळे तिच्यामध्ये सुईशी संबंधित कोणत्याही धोक्याची शक्यता नाही. या पट्टीचा वापर करण्यासाठी वैद्यकीय दक्षतेचीही गरज नाही. या संशोधनाचे प्रमुख शिंसाकू नकागावा यांनी सांगितले की, या पट्टीची सुगमता पाहता लसीकरणाला चालना देण्यासाठीही तिचा वापर केला जाऊ शकेल.
0
अरेच्चा! मातीशिवाय शेती!

महाराष्ट्रातील काही ठिकाणीही या तंत्रज्ञानाद्वारे जनावरांसाठी पोषक चार्याचे उत्पादन घेतले जाते.?लंडन : अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मातीशिवाय केवळ पाण्यावर स्ट्रॉबेरी उत्पादनाचा महाप्रकल्प ब्रिटनमधील शेतकर्यांनी यशस्वी करून दाखविला असून, या प्रकल्पातून आतापर्यंत तब्बल ७५ हजार टन स्ट्रॉबेरीचे उत्पादनही घेण्यात आले आहे.
जमिनीवर उत्पादन घेण्याच्या पारंपरिक पद्धतीत मजुरांना खाली वाकून स्ट्रॉबेरीची तोडणी करावी लागते. यामुळे त्यांना पाठदुखी व अंगदुखीसारखा त्रास होतो. यावर हा अनोखा उपाय शोधत जवळपास पाच फूट उंचीवर लटकाविलेल्या ट्रेमध्ये स्ट्रॉबेरीचे उत्पादन या शेतकर्यांनी यशस्वी करून दाखविले आहे. विशेष म्हणजे यासाठी मातीचा अजिबात वापर करण्यात आलेला नाही. विशालकाय ट्रेमधील पाण्यावरच या स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्यात आले आहे. पिकाला पाण्याद्वारेच अन्नद्रव्यांचा पुरवठा करून शेतकर्यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे मजुरांना उभ्यानेच स्ट्रॉबेरीची तोडणी करता येते. शिवाय पिकाच्या गरजेनुसार हवामानही या प्रकल्पात नियंत्रित केले जाते. ब्रिटनच्या ससेक्स प्रांतात १६ एकरावर उभारण्यात आलेल्या या महाकाय प्रकल्पातून स्ट्रॉबेरीचे विक्रमी उत्पादन सध्या घेतले जात आहे. पाण्यावर पीक उत्पादन घेण्याच्या या तंत्रज्ञानास हायड्रोपोनिक्स असे म्हणतात.










