
यवतमाळ, दि.१ – आपली हाक व बोंब आता राज्यात कोणीही ऐकत नाही सरकार विदर्भाच्या कोरडवाहु शेतकºयांच्या संपुर्ण पीककर्ज माफी व लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव देण्यास तयार नाही व सरकारने सर्व शेतकºयांचा विश्वासघात केला असून संपुर्ण जगात फिरणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले दुख दूर करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे आता राजधानी दिल्लीला जाऊन शेकडो शेतकरी विधवा पंतप्रधान निवसाबाहेर उपोषण सत्ताग्रह करण्याच्या एकमुखी ठराव आज पांढरकवडा येथे आयोजित सात बारा कोरा करा या आंदोलनात घेण्यात आला . हा ठराव विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या सचिव अपर्णा मालीकर यांनी मांडला. आंदोलनात सहभागी शेतकरी विधवा व दुष्काळग्रस्त शेतकºयांनी पाठींबा दिला.
कर्ज मुक्तीसाठी सरकारला बाध्य करण्यासाठी शेतकºयांचे सर्व पक्ष ,पंथ व विचार सोडून करा वा मारा असे टोकाचे सात बारा कोरा करा आंदोलन सुरु करण्याची घोषणा कापुस उत्पादक शेतकºयांचा प्रश्नांवर मागील दोन दशकापासून सतत लढा देणारे शेतकरी नेते व विदर्भ जनांदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी हे आवाहन यावेळी बोलताना केले . या आंदोलनात विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या नेत्या बेबी बैस ,भारती पवार ,चंद्रकला मेश्राम ,अचर्ना राउत ,अंजु भुसारी ,इंदु आष्टेकर ,सुनिता पेंदोरे ,जनाबाई घोडाम सह शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते मोहन जाधव ,प्रेम चव्हाण ,सुनील राउत ,किरण कोल्वते ,प्रीतम ठाकूर ,अंकित नैताम, गोपाल शर्मा , मनोज मेश्राम ,मुरली वाघाडे ,रामभाऊ मुत्तलवार , शेखर जोशी ,संतोष नैताम ,प्रकाश बोलेनवार ,भीमराव नैताम ,यशवंत गोलमवार , श्रीराम आत्राम ,भास्कर टेकाम ,अतुल कुडवे ,सीताराम आडे,भारत धुर्वे ,रामकुल कुमरे ,माधव तोडसाम सह शेकडो शेतकरी विधवांची उपस्थिती होती.
Archive for May, 2015
0
शेतकरी विधवा करणार पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर उपोषण
0
करणीच्या संशयातून वहिणीचा खून

यवतमाळ, दि. १ – करणीच्या संशयातून दिरानेच कुºहाडीचे वार करून वहिनीची खून केल्याची घटना आज दि. १ मे रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास तरोडा येथे घडली.
सुनंदा विजय धबाले (५०) रा. तरोडा असे मृतक महिलेचे नाव आहे. तर जयानंद अर्जुन धबाले (४२) रा.तरोडा असे आरोपीचे नाव आहे. अंगणवाडी सेविका मृतक सुनंदा धबाले हिच्यावर तिचा दिर आरोपी जयानंद व त्याची पत्नी आशा हे दोघे जादूटोण्याचा संशय घेत होते. त्यावरून आशा धबाले व सुनंदा धबाले या दोघींमध्ये सतत वाद होत होते. आज सकाळीही त्याच्यात वाद उफाळला. यावेळी आरोपी दिर जयानंद याने रागाच्या भरात घरात घुसून वहिनी सुनंदावर कुºहाडीने वार केल्याने ती गंभीर जखमी झाली होती. त्याच्यावर उमरखेड येथे प्राथमिक उपचार करून नांदेड येथे हलविले. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.
0
अपंग महिलेस पेटविले

मारेगाव,दि. १ – तालुक्यातील भालेवाडी येथे राहणाºया ३० वर्षीय अपंग महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून पेटविल्याची घटना ३० एप्रीलला घडली. अंजना मेश्राम असे मृतक महिलेचे नाव आहे. अनिल भगत या इसमासोबत ती घरठाव करून भालेवाडी येथे राहत होती. अनिल नेहमी मद्यप्राशन करून अंजनासोबत वाद करायचा. घटनेच्या दिवशी गावात लग्न असल्याने सर्व गावातील नागरिक वधुमंडपी गेले होते. ही संधी साधून अनिलने अंजनासोबत वाद सुरू केला. वाद विकोपाला गेल्याने अनिलने अंजनाच्या शरीरावर रॉकेल टाकून पेटवून दिले. तिने आरडाओरड केला मात्र आजुबाजुला कुनीच नसल्याने मदतीला आले आहे. त्यामुळे अंजनाचा होरपळून जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मारेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
0
विना-अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत पाच रुपयांनी कपात
नवी दिल्ली – विना-अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत पाच रुपयांनी कपात करण्यात आली आहे.
दिल्लीत १४.२ किग्रॅ सिलेंडरच्या किंमतीत पाच रुपयांची कपात करण्यात आली असून आता विना-अनुदानित सिलेंडरसाठी ६१६ रुपये द्यावे लागणार आहे.
सध्या दिल्लीमध्ये १२ सिलेंडरहे ४१७ या अनुदानित किंमतीमध्ये मिळत आहे. मात्र त्याहून अधिकच्या सिलेंडरसाठी आता ६१६ रुपये द्यावे लागतील.
तर मुंबईत विना-अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत ४.५० पैशांची कपात करत ही किंमत ६२७.५० रुपये करण्यात आली आहे. तर कोलकातामध्ये विना-अनुदानित सिलेंडरची किंमत ६५४.५० रुपयांवरुन ६४९ रुपये आणि चेन्नईमध्ये ६०८.५० रुपये इतकी करण्यात आली आहे.
यापूर्वी विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत एक मार्च रोजी पाच रुपयांनी, तर एक एप्रिल रोजी ११ रुपयांनी वाढ झाली होती.
0
महाराष्ट्र दिनी विदर्भात स्वतंत्र विदर्भाचे झेंडे

नागपूर- संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असताना नागपुरात मात्र स्वतंत्र विदर्भाचे झेंडे फडकवण्यात आले. व्ही कॅन संस्थेने (विदर्भ कनेक्शन) वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी झेंडा फडकवला. व्ही कॅनच्या या वेगळ्या विदर्भासाठीच्या आंदोलनाला शंभर लोकही उपस्थित नव्हते. त्यामुळे कार्यक्रमाचा फज्जा उडाला.
नागपुरमधील विष्णूजी की रसोई येथे विदर्भाचा ध्वज फडकवण्यात आला. यानंतर व्ही कॅन उपस्थित सदस्यांनी वेगळ्या विदर्भासाठी प्रतिज्ञा केली.
वेगळ्या विदर्भाच्या नावावर भाजपाने विदर्भातील जनतेचा विश्वासघात केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी वेगळ्या विदर्भाचे दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला.
0
धार्मिक स्वातंत्र्य अहवाल, सरकारने फेटाळला

नवी दिल्ली – धार्मिक स्वातंत्र्यासंबंधीचा अमेरिकन आयोगाचा अहवाल केंद्र सरकारने फेटाळून लावला आहे. अमेरिकन आयोगाचा अहवाल फारसे महत्व देण्यासारखा नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
भारत, भारताचे संविधान आणि समाज यांना व्यवस्थित समजून न घेता तर्क मांडण्यात आले आहेत असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
अमेरिकन काँग्रेसच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासंबंधीच्या अहवालातून केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य करण्यात आले आहे.
मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून भारतात जातीय व धार्मिक हिंसाचारात वाढ झाली असून, सत्ताधारी भाजपा नेत्यांकडून अल्पसंख्याकांची मानहानी सुरू आहे. त्याचप्रमाणे रा. स्व. संघ आणि विश्व हिंदू परिषदेकडून हिंसक हल्ले आणि सक्तीच्या धर्मातरालाही अल्पसंख्याकांना सामोरे जावे लागत आहे,
असे ताशेरे अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासंबंधीच्या आयोगाने (यूएससीआयआरएफ) भारतातील धार्मिक स्वातंत्र्याविषयी सादर केलेल्या अहवालात ओढले आहेत. पण नरेंद्र मोदी सरकारला हे आरोप मान्य नसल्याने त्यांनी हा अहवालच फेटाळून लावला आहे.
0
औषधाचा पुत्रप्राप्तीशी संबंध नाही – रामदेव

नवी दिल्ली – योगगुरु बाबा रामदेव यांनी पुत्रप्राप्तीसाठी औषधे बनवित असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. संयुक्त जनता दलचे खासदार के.सी.त्यागी यांनी गुरुवारी संसदेमध्ये बाबा रामदेव यांची औषध कंपनी पुत्रप्राप्तीचा दावा करणा-या औषधांची विक्री करत असल्याचा आरोप केला होता.
बाबा रामदेव यांच्या औषधांवर बंदी घालण्याची मागणी त्यागी यांच्यासह जया बच्चन आणि जावेद अख्तर यांनी केली होती. यावर रामदेव यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषद घेऊन हे आरोप फेटाळून लावले.
पुत्रजीवक बीज असे औषधाचे नाव असले तरी, या औषधावर पुत्रप्राप्ती होईल असे कुठेही म्हटलेले नाही. मूळ वनऔषधीचे नाव पुत्रानजीवा असल्याने त्या औषधाला पुत्रजीवक बीज हे नाव देण्यात आले. त्याचा पुत्रप्राप्तीशी काहीही संबंध नाही असे रामदेव यांनी सांगितले.
ज्या खासदारांना आयुर्वेदाबद्दल काहीही माहिती नाही त्यांनी असे आरोप करण्याआधी विचार करायला हवा होता. त्यागी यांनी चूकीचे आरोप केले आहेत त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी रामदेव यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा मलिन करण्यासाठी आपल्याला लक्ष्य केले जात आहे असा आरोप त्यांनी केला. राज्यसभेत के.सी.त्यागी यांनी औषधाची पाकिटे दाखवून या औषधांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. जावेद अख्तर आणि जया बच्चन यांनी त्यांना पाठिंबा दिला होता.










