
नवी दिल्ली, – लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर प्रियंका गांधी या राजकारणात उतरणार असल्याची चर्चा आहे. या वर्षी होणा-या विधानसभा निवडणुकीनंतर प्रियंका गांधी यांना काँग्रेसमध्ये महत्त्वाचे पद दिले जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली असून त्यांच्याकडे पक्षाचे महासचिव किंवा उत्तरप्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार दिला जाऊ शकतो.
लोकसभा निवडणुकीपासून प्रियंका गांधी यांनी राजकारणात यावे अशी मागणी काँग्रेसचेच कार्यकर्ते करत होते. मात्र प्रियंका गांधी यांनी राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघांमध्येच सोनिया गांधी व राहुल गांधींसाठी प्रचार केला होता. निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वावर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी या राहुल गांधींना पाठबळ देण्यासाठी सक्रीय राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. गांधी घराण्याशी जवळीक असलेल्या तीन नेत्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्रियंका गांधी यांच्याकडे महासचिव किंवा उत्तरप्रदेश प्रदेशाध्यक्ष पद दिले जाऊ शकते. सध्या महासचिव पदावर जनार्दन त्रिवेदी तर उत्तरप्रदेशच्या प्रदेशाध्यक्ष पदावर निर्मल खत्री आहेत.
प्रियंका गांधी या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालीच पक्षात काम करतील. यामध्ये राहुल गांधी यांना डावलून प्रियंका गांधींना पुढे आणण्याचा प्रयत्न नाही असे एका काँग्रेस नेत्यांने इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले. उत्तरप्रदेशमध्ये अमित शहा यांना काँग्रेसमधून फक्त प्रियंका गांधीच टक्कर देऊ शकतात असे काँग्रेस नेत्यांनी पक्षनेतृत्वाला सांगितले आहे. अमित शहांप्रमाणेच प्रियंका गांधी यांचाही कार्यकर्त्यांशी संपर्क चांगला असून या संघटन कौशल्याची पक्षाला आवश्यकता आहे. आता प्रियंका गांधींविषयीचा अंतिम निर्णय सोनिया गांधी आणि राहुल गांधी घेतील असे काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले.
Archive for August 4th, 2014
0
काँग्रेसला तारण्यासाठी प्रियंका गांधी राजकारणात ?
0
शरीरसौष्टवपटू सुहास खामकरला लाचखोरीप्रकरणी अटक

पनवेल, दि. ४ – मिस्टर इंडिया, आशिया श्री अशा पुरस्कारांवर नाव कोरणारा शरीरसौष्टवपटू सुहास खामकरला पनवेल पोलिसांनी लाचखोरीप्रकरणी अटक केली आहे. पनवेलमध्ये नायब तहसीलदार म्हणून काम करणा-या सुहासला ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये मराठी झेंडा रोवणारा सुहास खामकर हा पनवेलमध्ये नायब तहसीलदारपदावर कार्यरत होता. सुहासने सात बारा उतारावर नाव टाकण्यासाठी एका ग्रामस्थाकडून ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी पनवेल येथील अँटी करप्शन ब्यूरोकडे तक्रार दाखल झाली होती. सोमवारी अँटी करप्शन विभागाने सापळा रचून सुहास खामकरला अटक केली.
गुजरातमधील मुली आजही पोहून गाठतात शाळा!
अहमदाबाद – सोळ वर्षांची गीता बरिया सकाळी सात वाजता शाळेसाठी तयार असते. पांढरा शुभ्र पंजाबी ड्रेस नेसून लांब केसांना वेणी बांधून मैत्रिणींची वाट पाहत असते. सगळ्या मैत्रिणी आल्यानंतर तिला नदीतून पोहून शाळेत जायचं असतं. हा तिचा दररोजचा दिनक्रम आहे.
मध्य गुजरातच्या आदिवासी बहूल छोटा उदयपूर जिल्ह्यातील सजनपुरा या गावातले हे चित्र. नदी किनारी उभी राहून गीता आपल्या मैत्रिणींची वाट पाहतेय. हे सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या गावांमधून इथं आलेले आहेत. नदीचं पाणी थंडगार आहे. परंतु सहाशे मीटरचं अंतर त्यांना कापायचं आहे. मात्र गीतासह इतर १०० विद्यार्थ्यांसाठी शाळेत जाण्यासाठी हा एक शॉर्टकटचा मार्ग आहे. त्यानंतर आणखी पुढे त्यांना ५ किमी अंतर कापून शाळेत जायचं आहे.
या विद्यार्थ्यांसोबत २० लिटर पाणी मावण्याची क्षमता असलेलं एक पितळेचं पाण्याचं भांडं असतं. याला येथे ‘गोहरी’ म्हणतात. गोहरीत पुस्तकं टाकून विद्यार्थी नदीत उडी मारतात. मुलीही असंच करतात. मुलं एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर पोहचेपर्यंत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मुलांच्या पालकांची आळीपाळीने ड्यूटी लावलेली असते.
दहाव्या वर्गातच शिकणारा सिद्धार्थ आपली कहाणी सांगतो असतो, ‘शाळेचा गणवेश आणि पुस्तकं आम्ही भांड्यात टाकून नदी ओलांडतो. दुसऱ्या किनाऱ्यावर पोचल्यानंतर आम्ही भांड्यातून कपडे काढून नेसून शाळेत जातात. गीताचे अनुभव फार विदारक आहे, ‘नदीपल्याड किनाऱ्यावर गेल्यावर आम्हाला तर कपडे बदलायलाही जागा नसते. ओल्या कपड्यातच शाळेत जावं लागतं. त्यामुळे आम्ही अनेकदा आजारी पडतो. परीक्षा तोंडावर आहे. पुन्हा थंड पाण्यात पोहून शाळेत जायचं आहे. गीता सोबत इतर ३० विद्यार्थीनी दररोज पोहून शाळेत जातात.
न्यायाधीशांनी केले लैंगिक शोषण, महिला न्यायाधीशाचा आरोप
नवी दिल्ली, – मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठातील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवणा-या ‘विशाखा समिती’चे प्रमुखपद भूषवणा-या महिलेने येथील एका उच्च न्यायलयाच्या न्यायाधीशांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. चीफ जस्टिस ऑफ इंडियासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश या सर्वांना पत्र लिहून पीडित महिलेने ‘त्या न्यायाधीशावर’ अनेक गंभीर आरोप लावले असून शोषणाला कंटाळून त्या महिलेने आपल्या पदाचा राजीनामाही दिला आहे.
0
येवल्याजवळ अपघात; सहा ठार

येवला : शहरापासून मनमाडकडे बारा कि.मी. अंतरावर असणाऱ्या तांदूळवाडी फाट्याजवळ व्हॅन व टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात चार वर्षीय मुलासह सहा युवक ठार झाले. सदरची घटना रविवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली.
मारुती व्हॅनमधून (क्र. जीजे १८ एएस २९०१) मध्य प्रदेशातील नऊ भाविक शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येत होते. सदरची व्हॅन तांदूळवाडी फाट्याजवळ हॉटेल मेवाडनजीक आली असता याचदरम्यान मनमाडच्या दिशेने निघालेला आयशर टेम्पो (क्र. एमपी ४६ जी ०७५३) यांच्यात जोरदार समोरासमोर धडक झाली. परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊसही सुरू होता.
भीषण अपघातामध्ये व्हॅनमधील पाच प्रवासी जागीच ठार झाले, तर अन्य चौघांना येवला ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नाशिक रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना केले होते. मात्र, रस्त्यातच चौघांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर अन्य तिघांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातातील मयतांपैकी चार जण मध्य प्रदेशातील डेहार (ता. कोकसे, जि. धार) येथील आहेत. त्यांची नावे अशी: जितेंद्र हनसिंग बगेर (२३), चेतन रमेश सिसोदिया (२१), शैलेंद्र पंकज बगेर (४), अनिल महेंद्र पटेल (२०), रवींद्र रणजितसिंग चव्हाण (३०, रा. गुडगु, ता. अली, जि. राजापूर, मध्य प्रदेश) आणि अनिल महेंद्र पटेल (१९) यांचा समावेश आहे. राहुल नानसी बामनिया (२२, रा. मानवतनगर, इंदूर) याच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झालेली आहे, तर अनिल चंद्रसिंग किराडे (२०, रा. डेहार, ता. कोकसे, जि. धार) याच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे. पंकज नारायण बगेर (२५) याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर नाशिकच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
0
शिक्षिकेवर सामूहिक बलात्कार करुन जबरदस्तीने केले धर्मांतर

मेरठ, – उत्तरप्रदेशमधील मेरठ येथे एका शिक्षिकेचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने तणाव निर्माण झाला आहे. बलात्कार करणा-या नराधमांनी जबरदस्तीने इस्लाम धर्मही स्वीकारायला लावला असे पिडीत शिक्षिकेचे म्हणणे असून या घटनेनंतर मेरठमध्ये तणाव निर्माण झाला होता. सध्या मेरठमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मेरठमध्ये खरखौडा गावात राहणारी पिडीत शिक्षिका गावातील मदरसामध्ये हिंदी आणि इंग्रजी शिकवायची. सहा महिन्यांपूर्वी तिने मदरसामध्ये शिकवणे सोडून दिले व दुस-या शाळेत काम करु लागली. ईदच्या दुस-या दिवशी मदरसामधील मौलाना सनौल्लाह, सरपंच नवाब खान, त्यांची मुलगी सना उर्फ निसरत आणि अन्य काही जणांनी तिचे अपहरण केले. अपहरणानंतर तिला हापूड येथेल मदरसामध्ये नेण्यात आले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला व त्यानंतर जबरदस्तीने तिला धर्मांतर करायला लावले. यानंतर तिला मुजफ्फरनगरमधील एका मदरसामध्ये डांबून ठेवण्यात आले होते. तिला दररोज गुंगीचे इंजेक्शन दिले जात होते असे पिडीत महिलेने तक्रारीत म्हटले आहे. रविवारी पिडीत महिलेने अपहरणकर्त्यांची नजर चुकवून तिथून पळ काढून बस स्थानक गाठले व तिथून ती खरखौडात परतली. घरी परतल्यावर तिने कुटुंबियांना सर्व घटनाक्रम सांगितला व त्यानंतर तिच्या कुटुंबाने सनौल्लाह, नवाब आणि अन्य दोघा जणांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे. वैद्यकीय चाचणीत महिलेवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेची माहिती मेरठमध्ये वा-यासारखी पसरली व परिस्थिती तणावपूर्ण बनली. भाजप कार्यकर्त्यांनी मेरठ – हापूड मार्गावर रास्ता रोको केला. तर संतप्त जमावाने काही घरांवर हल्लाबोल केला. पोलिस महासंचालक ए.एल. बॅनर्जी म्हणाले, या घटनेनंतर मेरठ आणि सभोवतालच्या जिल्ह्यांमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
0
महाराष्ट्र सदन पुन्हा वादात, यंदा गणेशोत्सव नाही?

नवी दिल्ली, – महाराष्ट्र सदनात मराठी खासदारांना मिळालेली दुय्यम वागणूक, निकृष्ट भोजन व त्यानंतर मुस्लीम कर्मचा-याला चपाती भरवण्यावरून झालेला गोंधळ, या सर्व घटना अद्याप ताज्या असतानाचा महाराष्ट्र सदन पुन्हा एकदा चर्चैत आले आहे. महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त यांनी यंदा महाराष्ट्र सदनाता गणेशोत्सव साजरा न करण्याचा फतवा काढल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.
महाराष्ट्र सदनात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाता साजरा होतो, त्यानिमित्ताने दिल्लीतील सर्व मराठी बांधव एकत्र येतात. मात्र बिपिन मलिक यांचा या उत्सवाला विरोध असून गेल्या २-३ वर्षापांसून त्यांनी गणेशोत्सव बंद करावा, असा धोशा लावला आहे. यावर्षी त्यांनी गणेशोत्सवासाठी जागा देणेही नाकारले असून सदनात ‘बाप्पाची’ प्रतिष्ठापना करण्यास, पूजा करण्यास मनाई करत हा उत्सव साजरा न करण्याचा फतवा काढला आहे. ‘राज्य शासनाचा सदनात साज-या होणा-या गणेशोत्सवाशी काहीही संबंध नाही. राज्य शासन यात सहभागी होत नाही, त्यामुळे यावर्षी सदनात उत्सव साजरा होईल की नाही हे आपल्याला माहीत नाही’, असे मलिक यांनी सांगितल्याचे समजते. दिल्लीत १९९७ सालापासून गणेशोत्सव साजरा होतो. सदनातील अनेक कर्मचारी कठोर परिश्रम करून हा उत्सव उत्साहात साजरा करत असत. मात्र आता मलिक यांच्या या भूमिकेमुळे अनेक वर्षापांसून सुरू असलेली गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा खंडित होण्याची शक्यता आहे.
0
१८ मुलांना इंजेक्शनची रिअॅक्शन
डॉ दिलीप चव्हाण
कल्याण -भिवंडीच्या इंदिरा गांधी मेमोरियल या सरकारी हॉस्पिटलात अमिकासीन या औषधामुळे १८ मुलांना उलट्या आणि जुलाब सुरू झाल्याची घटना रविवारी घडली. त्यामुळे पालक प्रचंड घाबरले होते. सुदैवाने हे इंजेक्शन कुणाच्याही जीवावर बेतले नाही. प्रसंगावधान राखत डॉक्टरांनी कॉन्ट्रन्स इंजेक्शन देत परिस्थीती नियंत्रणात आणून अनर्थ टाळला.
बदलत्या हवामानामुळे थंडी, ताप आणि न्युमोनियाच्या पेशंटमध्ये वाढ झाली असून भिवंडीच्या आयजीएम हॉस्पिटलमध्ये १ ते ७ वयोगटातील ३५ मुलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्री १० वाजता ड्युटीवर असलेल्या नर्सने नेहमीप्रमाणे यातील काही मुलांना अमिकासीन औषधाचा डोस दिला. त्यानंतर लगेचच यातील १८ मुलांना थंडी, उलट्या जुलाबचा त्रास होऊ लागला. त्यांचे हात पाय आखडले. यामुळे घाबरलेल्या पालकांनी हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ केला. मात्र हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टरांनी तत्काळ बालरुग्ण विभागात धाव घेत सर्व मुलांवर उपचार सुरू केले. यातील दोन मुलांची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे त्यांना ऑक्सिजन देण्यात आला. सुमारे ३ तासांनतर या मुलांच्या प्रकृतीत हळुहळू सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
औषधांची तपासणी
या इंजेक्शनची मुदत संपलेली नव्हती, असा दावा डॉक्टर्स करत असले, तरी मुदत उलटल्यामुळेच ही रिअॅक्शन झाली असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. ही इंजेक्शन तपासणीसाठी पाठविण्यात आली असून त्याचा अहवाल आल्यानंतर रिअॅक्शनचे कारण कळू शकेल, अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी नितीन मोकाशी यांनी सांगितले.
0
UPSCमेरिट लिस्टमधून २० गुण वजा

नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेत नव्याने सुरु करण्यात आलेली ‘सी-सॅट’ पद्धत रद्द करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. परंतु ग्रेडिंग किंवा गुणवत्ता यादी तयार करताना इंग्रजीच्या गुणांचा समावेश करण्यात येणार नसल्याचे केंद्र सरकारने आज, सोमवारी स्पष्ट केले. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेत ही माहिती दिली.
२०११ साली लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पुन्हा एकदा संधी देण्यात येईल अशी माहिती सिंह यांनी दिली. परंतु ही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारचे आश्वासन मंजूर नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. यामुळे केवळ प्राथमिक परीक्षेत लाभ होणार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. सी-सॅटमध्ये २० गुणांचे इंग्रजीचे प्रश्न असतात. ते गुण मेरिट यादीमध्ये सामिल केले जाणार नाही. म्हणजे प्राथमिक परीक्षेतील ४०० गुणांऐवजी ३८० गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार करण्यात येणार आहे. या निर्णयावर यूपीएससीचे अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. याबाबत कार्मिक विभागाचे सचिव अरविंद वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या तीन सदस्यांच्या समितीने गेल्या आठवड्यात सरकारला हवाल सादर केला आहे.
0
बांगलादेशमध्ये बोट बुडाली, २०० जण बेपत्ता

ढाका- बांगलादेशमधील पद्मा नदीत २५० जणांना घेऊन जाणारी बोट सोमवारी बुडाली. या दुर्घटनेत २०० हून अधिक जण बेपत्ता झाले आहेत. नदीतील भोवरे आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरल्याने ही बोट बुडाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना मुंशीगंज भागात घडली.
या दुर्घटनेतून ४५ प्रवाशांना वाचवण्यात यश मिळाले असून दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. प्रवाशांना वाचवण्यासाठी तातडीने वेगवान बोटी घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. तसेच प्रवाशांना वाचवण्यासाठी नौदल व अग्निशमन दलाच्या पाणबुडयांची मदत घेण्यात येत असल्याचे पोलिस अधिका-यांनी सांगितले. काही प्रवाशांनी स्वत: पोहून किनारा गाठला. मात्र अनेकजण बुडाले किंवा वाहून गेले असावेत, असे मुंशीगंजचे पोलिस प्रमुख तोफझ्झल हुसैन यांनी सांगितले. बोटींचे चुकीचे डिझाइन आणि सुरक्षेविषयक दर्जाशी तडजोड केल्याने बांगलादेशात बोटी बुडण्याचे प्रकार वाढत आहेत.










