
डरबन – प्रेयसीला चोर समजून तिच्यावर गोळया झाडणारा दक्षिण अफ्रिकेचा प्रसिध्द अपंग धावपटू ऑस्कर पिस्टोरियसला दक्षिण आफ्रिकेच्या न्यायालयाने पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
मागच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या न्यायालयाने पिस्टोरियसला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवले होते. गेल्यावर्षी व्हॅलटाईन डे च्या दिवशी घरात असताना ऑस्करने प्रेयसी रीवा स्टीनकॅंम्पवर चोर समजून तिच्यावर गोळया झाडल्या होत्या. यात रीवाचा मृत्यू झाला होता.
न्यायालयाने ऑस्करची पूर्वनियोजित हत्येच्या आरोपातून सुटका केली होती मात्र सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. फिर्यादी पक्षाने ऑस्कला दहावर्षांसाठी तुरुंगवासात पाठवण्याची मागणी केली होती तर, बचावपक्षाने कमीत कमी शिक्षा म्हणून नजर कैदेची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ऑस्करला पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
दोन्ही पाय नसतानाही यशस्वी धावपटू बनणारा ऑस्कर क्रीडा जगतात ब्लेड रनर म्हणून ओळखला जातो. अपंगांसाठी असणा-या पॅराऑलिंपिकमध्ये चमक दाखवल्यानंतर २०१२ लंडन ऑलिंपिक स्पर्धेत पिस्टोरियसला प्रवेश मिळाला. तेथे त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.लंडन ऑलिंपिकमध्ये ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत त्याने उपांत्यफेरीही गाठली होती. मागच्यावर्षी घरात असताना त्याने प्रेयसीला चोर समजून तिच्यावर गोळया झाडल्या यात तिचा मृत्यू झाला. कायद्याची पदवीधर असणारी २९ वर्षीय रीवा पेशाने मॉडेल होती.
Archive for October 21st, 2014
0
ऑस्कर पिस्टोरियसला पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा
0
शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी भाजपच्या हिताशी तडजोड नाही

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तुलनेत निम्म्या जागा मिळवूनही शिवसेनेला १९९५ च्या जुन्या फॉर्म्युल्यानुसार सत्तेत अर्धा वाटा हवा आहे. सन्मानजक प्रस्ताव मिळाला तर, पाठिंब्याचा विचार करु असे सांगून शिवसेनेने तसे संकेतही दिले आहेत.
मात्र शिवसेनेसमोर कुठेही न झुकता आपल्या अटी-शर्तीनुसार सरकार स्थापन करण्याची भाजपची रणनिती आहे. दिल्लीतील भाजप नेत्यांनी शिवसेनेसमोर गुडघे न टेकण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले की, आम्ही शिवसेनेसोबत युती तोडली नाही. महाराष्ट्रात आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तरी, आम्ही दिल्लीत अनंत गीतेंना राजीनामा द्यायला सांगितला नाही. मुंबई महापालिकेत आमच्या पाठिंब्याने शिवसेनेचा महापौर आहे. यावेळी महाराष्ट्रात सरकार स्थापन करताना आम्ही आमच्या हिताशी कुठलीही तडजोड करणार नाही. महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला सर्वात मोठा पक्ष म्हणून कौल दिला आहे.
यामुळे शिवसेनेने पाठिंबा दिला नाही तर, राष्ट्रवादीचा बाहेरुन पाठिंबा घेण्याचा पर्याय भाजपने खुला ठेवला असून, अपक्षांना साथीला घेऊन, भाजप स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करु शकते.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह मंगळवारी भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्याच्या प्रक्रियेसाठी पक्षाचे निरीक्षक म्हणून मुंबईत येणार होते. मात्र अचानक त्यांचा हा मुंबई दौरा रद्द करण्यात आला. ते आता दिवाळीनंतर मुंबईत येणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक १२२ जागा मिळाल्या आहेत. त्याखालोखाल शिवसेनेने ६२ जागा जिंकल्या. सत्ता स्थापनेसाठी भाजपला आणखी २३ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.
0
दलित हत्याकांड; एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील दलित हत्याकांडांच्या घटना सुरूच असून ऐन दिवाळीत पाथर्डी तालुक्यात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आई, वडील आणि तरुण मुलगा यांचे तुकडे करून मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आले आहेत. खुनाचे कारण तसेच आरोपींबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. जामखेड तालुक्यातील खर्डा येथे काही महिन्यांपूर्वीच अशी घटना घडली होती. या दोन्हींमध्ये काहीअंशी साम्य असल्याचे सांगण्यात येत आहे.
पाथर्डी तालुक्यातील जवखडे खालसा या गावातील जाधव वस्तीत ही घटना घडली. तेथे संजय जगन्नाथ जाधव (वय ४२), जयश्री संजय जाधव (वय ३८) व सुनील संजय जाधव (वय १९) हे तिघे राहतात. त्यांचे तिघांचेच कुटूंब आहे. जाधव यांच्या मालकीची एक एकर शेती आहे. त्यांचा मुलगा सुनील हा मुंबईत एका दूध डेअरित नोकरी करतो. आठ दिवसांपूर्वी तो गावी आला होता. त्यांचे घर गावापासून पाच किलोमीटरवर शेतात आहे. आज सकाळी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्यावर शेतात काम करणाऱ्यांनी जाधव यांच्या नातेवाईकांना कळविले. त्यांनी येऊन पाहिले असता घरात कोणीही नव्हते. घराच्या ओट्यावर थोडेसे रक्त सांडलेले होते. त्यामुळे नातवाईक आणि ग्रामस्थांनी जाधव कुटुंबियांचा शोध सुरू केला. पाथर्डी आणि नगरच्या रुग्णालयांत चौकशी करण्यात आली. मात्र, काहीही माहिती मिळाली नाही. सायंकाळी जाधव यांच्या वस्तीपासून पाचशे फुटावर असलेल्या एका जुनाट, पडीक विहिरीत मृतदेहांचे तुकडे आढळून आले. गोणापटावर टाकून मृतदेह विहिरीजवळ फरपटत आणल्याचे आढळून आले. याची माहिती मिळाल्यावर पाथर्डीचे पोलिस तेथे गेले. तोपर्यंत ग्रामस्थ संतप्त झाले होते. वरिष्ठ पोलिस अधिकारी आल्याशिवाय मृतदेहांचा पंचनामा करून दिला जाणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. त्यामुळे नगरहून सायंकाळी पोलिस अधिकारी रवाना झाले. खुनाचे कारण, यातील आरोपी यांच्याबद्दल आद्याप माहिती मिळालेली नाही. रात्री या तिघांची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचा संशय आहे. दलितांवरील अत्याचारांच्या घटनांसंबंधी नगर जिल्हा सतत चर्चेत असतो. काही वर्षांपूर्वी सोनईत घडलेले दलित हत्यांकाड, काही महिन्यांपूर्वी खर्डा येथील दलित युवकाची हत्या यानंतर आता पुन्हा एकदा संपूर्ण दलित कुटुंबच संपविण्य़ाची घटना घडल्याने पुन्हा एकदा नगर जिल्हा चर्चेत आला आहे. निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर आणि ऐन दिवाळीतच ही घटना घडली आहे. याचे पडसाद पुन्हा एकदा राज्यभर उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.









